Monday, November 3, 2025
Happy Diwali

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पेट्या पाठविण्याची परंपरा कायम

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पेट्या पाठविण्याची परंपरा कायम

वाशीत १ लाख २२ हजार हापूस पेट्या

रत्नागिरी : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोकणचा हापूस बाजारात पाठविण्याची परंपरा यंदाही अनेक बागायतदारांनी जपली आहे. त्यामुळे सलग दोन दिवस वाशी बाजारात हापूसच्या ६७ हजार आणि ५५ हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पेट्या आल्याचे वाशीतील व्यावसायिकांनी सांगितले. हापूसचा दर ३०० ते ८०० रुपये डझन विकला जात असून तुलनेत पाचशे रुपयांनी कमी आहे. मात्र मागील आठवड्यातील घसरण काहीअंशी थांबल्यामुळे बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला हापूस बाजारात विक्रीसाठी पाठविण्याची परंपरा आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने हंगाम सुरू होतो. परंतु यंदा फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून तुलनेत सर्वाधिक हापूस वाशीसह पुणे, अहमदाबाद, पश्चिम महाराष्ट्रातील विविध बाजारात दाखल झाला. लवकर आणि मुबलक आंबा विक्रीसाठी आला होता. ५० टक्केहून अधिक बागायतदारांनी पाडव्याला विक्रीचा मुहूर्त केला आहे. त्यांच्याबरोबर इतर बागायतदारांच्या मिळून सोमवारी वाशी बाजारात दाखल झालेल्या ९२ हजार पेटींपैकी हापूसच्या ६७ हजार पेट्या आहेत. तर उर्वरित अन्य आंबे आहेत. मंगळवारी ५५ हजार पेटी आंबा कोकणातून दाखल झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

पाडव्याला एक लाख पेटी कोकणातून पाठवली जाते, ही परंपरा यंदाही कायम असल्याचे आकडेवारी पाहता दिसून येते. गतवर्षी याच कालवधीत २९ हजार आणि ४० हजार पेट्या आल्या होत्या. मात्र कर्नाटकसह अन्य आंब्यांची आवक कमी होती. यंदा हापूसची दुप्पट आवक आहे.

दरम्यान, हंगामाच्या आरंभीला हापूसचा पेटीचा दर साडेसहा ते सात हजार रुपये होता. त्यानंतर काही कालावधीसाठी पेटीचा दर ३७०० रुपयांपर्यंत राहिला. आंब्याला डझनला ८०० रुपये दर मिळत तर सर्वात कमी वजनाच्या फळाला ३०० रुपये दर मिळत आहे. गतवर्षी पाचशे रुपये अधिक दर होता असे व्यावसायिकांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >