Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीनाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांचा आयुक्तांनी घेतला आढावा

नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांचा आयुक्तांनी घेतला आढावा

२०२४ मध्ये २ लाख ७० हजार मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट

मुंबई : पावसाळापूर्व कामांचा निपटारा करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले असून मिठी नदीसह पूर्व उपनगरांतील विविध नाल्यांची पावसाळापूर्व कामांची पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज पाहणी करून आढावा घेतला. ठरल्या वेळापत्रकानुसार मे अखेर गाळ काढण्याची कामे पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच आपल्या या पहिल्याच पाहणी दौऱ्यात त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना पावसाळापूर्व कामांना वेग देण्याच्या सूचनाही केल्या.

पूर्व उपनगरांतील कामांच्या पाहणीआधी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी एम पश्चिम विभाग कार्यालयास भेट देवून विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. दौऱ्याच्या प्रारंभी चेंबूरस्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या दौऱ्यात सर्वप्रथम आयुक्त गगराणी यांनी एम पश्चिम विभागात चेंबूर स्थित पोस्टल कॉलनी येथील सखल भागात पावसाळी पाणी निचरा करणाऱ्या यंत्रणेची पाहणी केली. सध्या पालिका प्रशासनाकडून मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांना वेग देण्यात आला आहे. एल विभागांतर्गत वांद्रे कुर्ला संकुलात मिठी नदीतून गाळ उपसा करण्याची कामे सुरू आहेत, तेथेही आयुक्तांनी पाहणी केली.

मिठी नदीतील गाळ उपसण्याचे काम द्विवार्षिक कंत्राटाद्वारे करण्यात येते. प्रतिवर्षी पालिकेतर्फे मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम दोन टप्प्यांमध्ये (एकूण वार्षिक परिमाणाच्या ८० टक्के पावसाळ्यापूर्वी व २० टक्के पावसाळ्यादरम्यान / पावसाळ्यानंतर) करण्यात येते. त्यानुसार सन २०२४ या वर्षाकरिता सुमारे २ लाख ७० हजार मेट्रिक टन इतका गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातील टप्पा-१ (पावसाळ्यापूर्वी) मधील गाळ काढण्याची कामे प्रगतिपथावर आहेत. मिठी नदीचा टप्पा-१ (पावसाळ्यापूर्वी) मधील गाळ काढण्याची कामे जानेवारी २०२४ पासून सुरू करण्यात आली आहेत. एकूण २ लाख १६ हजार १७४ मेट्रिक टन इतका गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आजमितीस सुमारे १ लाख १७ हजार ९७० मेट्रिक टन (५४.५७ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे. उर्वरित गाळ दिनांक ३१ मे २०२४ पर्यंत काढण्यात येईल.

आजच्या दौऱ्यात एन विभागात लक्ष्मी बाग नाला, एस विभागातील एपीआय नाला, वीर सावरकर मार्गावरील उषा नगर नाला, गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता जंक्शनवर भांडुपनजीक बॉम्बे ऑक्सिजन नाला आदी ठिकाणी आयुक्त गगराणी आणि अधिकाऱ्यांनी भेट देवून नाल्यातून गाळ उपसा करण्याच्या कामांची पाहणी केली. ठिकठिकाणी नाल्यांमधून गाळ उपसण्यासोबत सुरू असलेली संरक्षक भिंत बांधकाम, नाल्याकाठचे अतिक्रमण निर्मूलन, भांडुप आणि नाहूर दरम्यान रेल्वे रुळाखाली सुरू असलेले कल्वर्ट बांधकाम आदींचीही त्यांनी माहिती जाणून घेत योग्य ते निर्देश दिले.

पालिकेच्या भांडुप जलशुद्धीकरण संकुलास पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज भेट देऊन संकुलाची रचना आणि जलशुद्धीकरण प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. आशिया खंडातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र म्हणून प्रख्यात असलेल्या या संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून पालिकेच्या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो. भांडुप संकुल येथे १ हजार ९१० दशलक्ष लीटर आणि ९०० दशलक्ष लीटर पाणी शुद्धीकरण करणारी दोन युनिट्स आहेत. यानंतर पवई तलाव आणि परिसराची गगराणी यांनी पाहणी केली. तलाव आणि परिसरात सुरू असलेल्या पर्यावरण संवर्धन उपाययोजनांची सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली. तलावाला लागूनच असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये (पवई) देखील फेरफटका मारून त्यांनी पाहणी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -