
कधी होणार प्रवास सुरु?
मुंबई : प्रवाशांची होणारी धावपळ आणि गर्दीमुळे पश्चिम रेल्वेने (western railway) हार्बर मार्गाचा (Harbour Line) बोरिवलीपर्यंत दोन टप्प्यांत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने हार्बर मार्गावर लोकल ट्रेन आता बोरिवलीपर्यंत धावणार आहे. त्यामुळे हार्बर रेल्वेचा मार्ग ८ किलोमीटरने वाढणार आहे. या प्रकल्पाचं काम २०२७-२८ या वर्षात पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बोरिवलीपर्यंत पश्चिम रेल्वे व हार्बर रेल्वे असे दोन पर्याय उपलब्ध होणार असल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
हार्बर मार्ग बोरिवलीपर्यंत विस्तारीकरण केल्याने पश्चिम मार्गावरील अंधेरी आणि बोरिवली स्टेशनदरम्यानची लोकल गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा मे महिन्यात जारी होण्याची शक्यता आहे. तर या प्रकल्पाचं काम १५ जूनपासून सुरु होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी ८२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात गोरेगाव ते मालाडपर्यंत स्टेशनचा विस्तार होणार आहे. तर मालाड ते बोरिवली या दुसऱ्या टप्यात ५ किलोमीटरचं काम पूर्ण होईल, असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या हार्बर मार्गावर लोकल ट्रेन या सीएसएमटी ते गोरेगाव स्टेशनपर्यंत रेल्वेसेवा सुरु आहे. मागच्या वेळी हार्बर मार्गावर अंधेरी ते गोरेगाव हा टप्पा वाढविण्यात आला होता. या टप्प्याचं काम २०१८ पर्यंत पूर्ण झालं होतं. दरम्यान, बोरिवलीपर्यंत हार्बर विस्तारीकरण करण्यासाठीचं प्राथमिक काम पूर्ण झालं आहे. या कामासाठी भू-तांत्रिक तपासणी, सर्वेक्षण, झाडांचे ड्रोन सर्वेक्षण आदी कामांचा समावेश आहे. यामुळे भविष्यात वातानुकूलित लोकल चालवणेही शक्य होणार असल्याचेही नमूद केले.