राजेंद्र पाटील
आज माननीय नारायण राणे साहेब जीवनाची ७२ वर्षे पूर्ण करून ७३वे वर्षं सुरू करीत आहेत. ७३व्या वाढदिवसानिमित्त मी त्यांचे मन:पूर्वक अभीष्टचिंतन करतो. पूर्वीच्या काळी साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वृद्धत्व आले असे मानले जाई. सध्याच्या युगात साठावे वर्ष म्हणजे दुसरे तारुण्य मानले जाते. सत्तरीमध्ये मात्र शरीराच्या हालचाली मंद होतात आणि वय झाल्याची जाणीव व चिन्हे दिसू लागतात. राणे साहेबांकडे पाहिल्यानंतर मात्र तसा अनुभव येत नाही. त्यांची ऊर्जा आणि उत्साह तरुणांना सुद्धा लाजवणारा आहे.
आताच्या १ तारखेचाच अनुभव घ्या. कॅबिनेट मिटिंगसाठी राणे साहेब सकाळी १०च्या विमानाने दुपारी १२च्या सुमारास दिल्लीला पोहोचले. तिथे त्यांना काही कानमंत्र मिळाला असावा. संध्याकाळी ५च्या विमानाने ते पुण्याला आले. रात्री मुक्काम. सकाळी ते सडकमार्गे सौ. वहिनींना सोबत घेऊन मुंबईला निघाले. ४ वाजता थेट मुंबईच्या नरिमन पॉइंटच्या आफिसला पोहोचून पत्रकार परिषदेच्या मुद्द्यांची जुळवाजुळव. जाहीर केल्याप्रमाणे बरोबर ५ वाजता पत्रकार परिषदेला सुरुवात. पत्रकार परिषद सुमारे ६ वाजता संपवून घरी गेले. दुसऱ्या दिवशी म्हणजे २ तारखेला सकाळी ७ वाजता घरातून निघून सिंधुदुर्गासाठी विमानात बसले. सिंधुदुर्गात पोहोचल्यानंतर त्यांनी सभा-बैठकांचा धडाका सुरू केला. दररोज तीन ते चार वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. एका आठवड्यात त्यांनी सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात वातावरण निर्माण केले. किती ही ऊर्जा आणि किती हा उत्साह!
इ.स. २००० पासून २०१४ पर्यंत राणे साहेबांचा प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून मी त्यांना जवळून पाहत आलो आहे. ते २००० साली विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यांचा कार्यक्रम ठरलेला असायचा. सोमवार ते गुरुवार, शुक्रवार ते मुंबईत असायचे. सरकारला धारेवर धरून विकासाच्या कामांचा पाठपुरावा होत असे. राणे साहेबांच्या दराऱ्यामुळे त्या वेळचे सरकार कायम धास्ती घेऊन असे. आठवड्याच्या शेवटी कोकणात जाऊन सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि राजकीय कार्यक्रम. याशिवाय राज्यभर दौरे व्हायचे ते वेगळेच. कधी कुठे थांबणे नाही, विश्रांती नाही.
राणे साहेबांच्या कार्यालयात भेटण्यासाठी आलेल्यांची गर्दी कायमचीच. आलेल्या प्रत्येक माणसाला भेटून दोन-चार मिनिटे बोलून त्याचे काम समजून घ्यायचे, काम होणार असेल तर तिथल्या तिथे ते करून देणे किंवा ज्याच्याकडे काम असेल त्याला फोन लावायचा असा कार्यक्रम असतो. भेटायला आलेल्या प्रत्येकाला भेटून नंतरच निघायचे हा रोजचा शिरस्ता. मागची सुमारे तीस-पस्तीस वर्षे तो चालू आहे. अनेक राजकीय नेत्यांची काम करण्याची पद्धत मी पाहिली आहे. भेटणाऱ्यांची गर्दी अनेकांकडे असते. अनेक नेते भेटण्यासाठी आलेल्यांना एका ठिकाणी थांबवतात. नंतर हे नेते तेथे स्वत: जातात, भेटण्याचा सोपस्कार सगळ्यांसाठी एकच असतो. कोणाची काही निवेदने असतील, तर सोबतची माणसे ती गोळा करतात आणि भेट संपते. राणे साहेबांसारखा वेळ देणारा नेता फारच विरळ.
लोकांशी असलेली ही बांधिलकी आणि आपलेपणा हा त्यांच्या लोकप्रियतेचा गाभा आहे. येत्या काळात या बांधिलकीमुळेच ते यशाची उंच गुढी उभारतील असा मला विश्वास आहे आणि त्याच माझ्या त्यांना शुभेच्छाही आहेत. वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा अभीष्टचिंतन!
[email protected]