Thursday, January 16, 2025
Homeताज्या घडामोडीआचारसंहितेचे पालन करताना ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’

आचारसंहितेचे पालन करताना ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’

मुंबई : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका २०२४ जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. या नियमांनाच ‘आचारसंहिता’ म्हटले जाते. निवडणूक घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी या आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली आहे.

आचारसंहिता अधिक विस्तृत असल्याने त्यापैकी निवडणूक काळात राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याबाबत काही महत्त्वाची तत्वे सांगितलेली आहेत.

काय करावे?

निवडणूक घोषित होण्यापूर्वी सुरू करण्यात आलेले कार्यक्रम पुढे सुरू ठेवता येतील. पूर, अवर्षण इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी मदतीचे कार्य सुरू ठेवता येईल. मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रकमेची किंवा इतर वैद्यकीय मदत देता येईल. इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका ही त्यांची धोरणे, पूर्वीची कामगिरी आणि कार्य यांच्याशीच संबंधित असावी. स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी.

प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धक किंवा इतर सुविधांचा वापर करण्याची परवानगी मिळवावी आणि ते वापरण्याच्या नियमांचे पालन करावे. सभांमध्ये अडथळे आणणाऱ्या, सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी. मिरवणूक सुरू होण्याची तसेच संपण्याची वेळ व जागा आणि ती जिथून जाणार असेल तो मार्ग अगोदर निश्चित करून पोलीस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी. सर्व कार्यकर्त्यांनी बिल्ले व ओळखपत्र ठळकपणे लावावेत आणि मतदारांना पुरविण्यात येणाऱ्या अनौपचारिक ओळखचिठ्ठया साध्या (पांढऱ्या) कागदावर असाव्यात आणि त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव असू नये.

काय करू नये?

निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे पालन करताना राजकीय पक्ष तसेच उमेदवारांना सत्ताधारी पक्ष / शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात करण्यास प्रतिबंध आहे. उमेदवार आणि मतदानासाठी आलेला मतदार यांच्याशिवाय इतर कोणाही मंत्र्याला मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करता येणार नाही. शासकीय काम आणि निवडणूक मोहीम/ निवडणूक प्रचार यांची सरमिसळ करू नये. इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टीका करू नये. वेगवेगळ्या जाती, समूह आणि धार्मिक किंवा भाषिक गट यांच्यामधील विद्यमान मतभेद वाढतील किंवा परस्पर द्वेष, तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये.

सर्व धर्मिय प्रार्थनास्थळ यांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, भित्तीपत्रके, संगीत यांच्यासाठी करू नये. मतदारांना लाच देणे, दारुचे वाटप करणे, मतदारांवर गैरवाजवी दडपण वा धाकदपटशा दाखविणे, तोतयेगिरी, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत प्रचार करणे, मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या 48 तासांत सार्वजनिक सभा घेणे आणि मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यांसारख्या गोष्टींना मनाई आहे. इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका यांच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करू नये. तसेच त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण करू नये.

ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा घेतल्या जात असतील अशा ठिकाणांहून मिरवणूक नेऊ नये. इतर पक्षांनी व उमेदवारांनी लावलेली भित्तीपत्रके काढून टाकू नयेत अथवा विद्रुप करू नयेत. याचबरोबर मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठ्या वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान कक्षाजवळ भित्तीपत्रके, ध्वज, चिन्हे आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करू नये. आचारसंहितेच्या या तत्त्वांचा भंग झाल्याचे नागरिकांना आढळल्यास त्यांनी सी-व्हिजील ॲपवर ध्वनीमुद्रण, ध्वनीचित्रमुद्रण या माध्यमातून तक्रार करावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -