Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Ajit Pawar: कोणाला धमकावले असल्यास संबंधितांनी पोलीस केस करावी

Ajit Pawar: कोणाला धमकावले असल्यास संबंधितांनी पोलीस केस करावी

अजित पवारांनी दिले शरद पवारांना आव्हान

पुणे : तुम्ही मला गेली कित्येक वर्षे ओळखता. अशा पद्धतीने धमकावण्याच्या गोष्टी केल्या असत्या तर जनतेने मला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता, असे करायचे नसते. संस्था चालविताना संस्थेच्या पद्धतीने चालवायची असते व राजकारण करताना राजकारणाच्या पद्धतीने करायचे असते. जर कोणाला धमकावले असल्यास संबंधितांनी पोलीस केस करावी. पोलीस त्याबाबतची चौकशी करुन कार्यवाही करतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता कोणाच्या दमबाजीला घाबरु नका, जे तुम्हाला दम देत आहेत. त्यांना त्या जागेवर कोणी बसवले, हे तुम्हाला अधिक सांगायची गरज नाही, असा टोला लगावला होता. यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी मंगळवारी (दि ९) बारामती दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

विजय शिवतारे यांच्या मागण्यांबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर काही मागण्या केल्या होत्या. त्याचवेळी त्यांनी त्यांच्या भागात त्यांच्या कार्यकर्त्यांचा पुरंदरवासीयांचा मेळावा घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ११ एप्रिल रोजी होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. आम्ही बोलतो तसे वागतो, आम्ही बदलत नाही.

आज एक बोलायचे, उद्या दुसरे बोलायचे. पुन्हा बोललेलं होऊ द्यायचं नाही, तसे नाही, असा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना टोला लगावत अजित पवार यांनी आम्ही शब्दाला जागून तिघेही जाणार असल्याचे सांगितले.

चांगली गोष्ट, शुभेच्छा उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

जानाई शिरसई योजनेबाबत आता आपण स्वत: लक्ष घालणार आहोत. ज्यांना अधिकार, जबाबदारी दिली. त्यांनी काम केले नाही. काम कसं होत नाही बघतो, मी ते काम पाहणार असल्याचा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांना लगावला होता. या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला अजित पवार यांनी ‘चांगली गोष्ट, शुभेच्छा. या तीन शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. नाशिक, सातारा येथील जागेबाबत महायुतीचे वरिष्ठ बसतील, त्यांनतर तोडगा काढला जाईल. त्यानंतर माध्यमांना माहिती दिली जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

लोकांना पटेल असे तरी त्यांनी बोलावे

संजय राऊत यांनी लोकसभेची लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे असे नमूद केले आहे. यावर अजित पवार यांनी पत्रकारांनाच तुम्हाला तरी खरंच अस वाटतं का, असे मिश्कीलपणे हसत प्रतिप्रश्न केला. एकवेळ ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे, असे ते म्हणाले असते तर ते मान्य करता आले असते. पण त्यांचा पक्ष महाराष्ट्राबाहेर नाही, त्यामुळे असे होणार नाही. लोकांना पटेल असे तरी त्यांनी बोलावे, असा टोला पवार यांनी राऊत यांना लगावला.

Comments
Add Comment