दलाल मालामाल पण व्यापारी व शेतकऱ्यांचे हाल
अबू धाबी : संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे कांद्याची निर्यात होत असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांनी १२ ते १५ रुपये किलोने कांदा विकला असून तोच कांदा यूएईच्या दुकानात निर्यात केल्यानंतर १२० रुपये किलोने विकला जात असल्याचा आरोप केला आहे.
निवडणुकीच्या (Election) काळात कांद्याचे वाढलेले भाव पाहता सरकारने डिसेंबरमध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, काही देशांच्या विशेष मागणीनुसार सरकार काही अटींच्या आधारे कांद्याच्या निर्यातीवर सूट देते. कांद्याच्या निर्यातीवर दीर्घकाळ बंदी असताना, संयुक्त अरब अमिराती सारख्या बाजारपेठेत सरकारने परवानगी दिलेली काही शिपमेंट कवडीमोल भावात विकली गेल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी नाराजीचा सूर मारला आहे. तसेच जागतिक बाजारपेठेत किमती वाढल्या आहेत, त्यामुळे निवडक आयातदार प्रचंड नफा कमावत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार जागतिक स्तरावर कांद्याचे दर प्रति टन ३००-४०० डॉलरच्या दरम्यान आहेत. तर अलिकडच्या काही महिन्यांत, युएई सारख्या प्रमुख बाजारपेठेतील किमती प्रति टन १५०० डॉलरपर्यंत वाढल्या आहेत. भारत, पाकिस्तान आणि इजिप्तने लादलेल्या निर्यात निर्बंधांमुळे किमतीत आणखी भर झाली असून देशात अलीकडील शिपमेंटची किमत प्रति टन ५०० डॉलर ते ५५० डॉलर इतकी असल्याचे निर्यातदारांनी सांगितले.
कांदा निर्यातदारांचे म्हणणे आहे की युएई आयातदारांना अशा शिपमेंट्सद्वारे आधीच ३०० कोटींहून अधिक नफा मिळाला आहे. याचा थेट फायदा यूएईच्या व्यापाऱ्यांना होत आहे. ही निर्यात सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत सरकारी मालकीची संस्था नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत केली जात आहे.