Tuesday, July 2, 2024
Homeब्रेकिंग न्यूजअरे बाप रे! एसटीने प्रवास करणा-यांचा जीव टांगणीला!

अरे बाप रे! एसटीने प्रवास करणा-यांचा जीव टांगणीला!

एसटी अपघातात होताहेत दरवर्षी तब्बल ३ हजाराहून अधिक मृत्यू

माहिती अधिकारांतर्गत अपघातांचा तपशील आला समोर

मुंबई : राज्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या अपघातामध्ये (ST Accident) मागील काही महिन्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागच्या तीन वर्षामध्ये प्रवाशांची संख्या देखील तीन पटीने वाढली आहे. मात्र वाढती अपघाताची संख्या देखील चिंताजनक आहे. माहिती अधिकारांतर्गत अपघातांचा तपशील समोर आला आहे. यात मागिल दोन वर्षापासून दरवर्षी तब्बल ३ हजाराहून अधिक मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्याने एसटीने प्रवास करणा-या प्रवाशांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे.

माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ दरम्यान ३३ कोटी २० लाख २२ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने एसटीला १ हजार ४६३ कोटी ७५ लाख ३१ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात ४९ कोटी ५५ लाख ४३ हजार प्रवाशांमुळे २ हजार ५३५ कोटी ५४ लाख ३४ हजार, २०२२- २३ मध्ये १५९ कोटी ७९ लाख ९२ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने ७ हजार ४१० कोटी २८ लाख ७८ हजार तर २०२३-२४ (फेब्रुवारी २०२४ पर्यंत) १८६ कोटी १२ लाख ७ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने ९ हजार १५६ कोटी २१ लाख ८१ हजार रुपयांचा महसूल एसटीला मिळाला आहे.

जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ दरम्यान ६२९ घडलेल्या बस अपघातांमध्ये ७१ मृत्यू झाले. २०२१-२२ मध्ये १ हजार २८१ अपघातांमध्ये १५९ मृत्यू, २०२२-२३ मध्ये ३ हजार १४ अपघातांमध्ये ३४३ मृत्यू झाले.

तर २०२३-२४ मध्ये (फेब्रुवारी २०२४ पर्यंत) ३ हजार १२१ अपघातांमध्ये ३८० मृत्यू नोंदवले गेल्याचेही सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.

यामध्ये मुंबई-गोवा महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या वाढली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर रविवार (७ एप्रिल) रोजी माणगाव येथे रिक्षा आणि शिवशाही भीषण बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगाव येथील मानस हॉटेल समोर आली असताना हा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त रिक्षाचा चुराडा झाला. अपघातामध्ये रिक्षातील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी साडेआकरा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

मुंबई गोवा महामार्गावर माणगाव परिसरात यापूर्वीही मोठे अपघात झाले आहेत. वर्षभरापूर्वी झालेल्या मोठ्या अपघातात हेदवी येथील एकाच घरातील नऊ जणांचा मृत्यू झाला होता.

अनेक ठिकाणी रस्त्याची कामे प्रलंबित असल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव, इंदापूर, नागोठणे परिसरात अनेकदा ट्रॅफिक जाम होण्याचे प्रकार घडत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -