सेवाव्रती: शिबानी जोशी
ग्राहक राजा असतो, जागो ग्राहक जागो, ग्राहक हिताय ग्राहक सुखाय, ग्राहकांचे समाधान हेच आमचं ब्रीदवाक्य… असे वाक्प्रचार आपण सध्याच्या भांडवलदारी काळामध्ये खूप ऐकत असतो; परंतु तरीसुद्धा ग्राहकाला त्याच्या पैशाचा पुरेपूर मोबदला मिळतो का? तसंच त्याला सुयोग्य दर्जाचा माल मिळतो का? जाहिरातीमुळे ग्राहकांची फसवणूक होते का? असे प्रश्न आज पडतात आणि ग्राहकांना न्याय कुठे मिळतो हे माहीत नसतं किंवा आपलं नशीब म्हणून ते सोडून देतात असं आपण बऱ्याच वेळा पाहतो. ग्राहकांच्या हितासाठी काहीतरी केलं पाहिजे हा ध्यास पन्नास वर्षांपूर्वी मात्र काही कार्यकर्त्यांनी उराशी बाळगला आणि त्यातूनच गुढीपाडव्याच्या दिवशी उभारली गेली एक गुढी ज्याचं नाव “मुंबई ग्राहक पंचायत”. गुढीपाडव्याला अनेक चांगल्या कामांची मुहूर्तमेढ रोवली जाते. आपल्या संस्कृतीत साडेतीन मुहूर्तातील हा अत्यंत शुभमुहूर्त मानला जातो. याच दिवसाचे निमित्त घेऊन मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्याला सुरुवात होऊन ४९ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि मुंबई ग्राहक पंचायतीने सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.
मुंबई ग्राहक पंचायतीचे संस्थापक कै. बिंदू माधव जोशी, सुप्रसिद्ध गायक, संगीतकार आणि संस्थेचे पहिले अध्यक्ष कै. सुधीर फडके (बाबूजी) आणि सर्वांचे लाडके कै. मधुकरराव मंत्री. बिंदू माधवांची दूरदृष्टी, बाबुजींची शिस्त आणि मधुकररावांच्या संघटन कौशल्याचा त्रिवेणी संगम म्हणजे मुंबई ग्राहक पंचायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
या त्रयींनी अशोक रावत, आप्पा साहेब, प्रतिभाताई गोडबोले अशा अन्य काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह मुंबईत ग्राहक पंचायतीची गुढी उभारली.
“ग्राहक” हा अर्थव्यवस्थेचा राजा. पण प्रत्यक्षात बाजारपेठेत ग्राहकांचे मोठ्या प्रमाणावर शोषणच होत होते. १९७४ – ७५ चा काळ म्हणजे गगनाला भिडलेली महागाई, कृत्रिम टंचाई, साठेबाजी, काळाबाजार, भेसळ आणि वजन-मापातील फसवणुकीने ग्राहकांचे शोषण होण्याचा काळ होता. आणि तो ग्राहक असंघटित होता. बिंदू माधवांनी अनेक विचारवंत, अर्थतज्ज्ञ, पत्रकार यांच्याशी चर्चा करून एक विचार कृतीत आणला. या त्रस्त पण निद्रिस्त ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू थेट खरेदी करून रास्त किमतीत दरमहा पुरवला तर ग्राहक संघटित व्हायला मदत होईल, असा विचार करून ग्राहक संघाद्वारे ग्राहक पंचायतीचे बीजारोपण प्रथम पुण्यात १९७४ मध्ये केले.
पुण्याप्रमाणेच मुंबईतही अशा प्रकारे ग्राहक संघ स्थापण्याचे बाबूजींबरोबरच मधुकरराव मंत्री यांनी मनावर घेतले व १९७५च्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईत वनिता समाजातून पहिले वाटप झाले. बघता बघता या आगळ्या ग्राहक चळवळीचा मुंबईत मोठ्या प्रमाणावर प्रसार होत गेला. हे वाटप नेमकं कसं होतं? तर ग्राहकांनी एकत्रित येऊन आपला एक समूह तयार करायचा. म्हणजे एखाद्या सोसायटीतील सर्व कुटुंब, एक गट तयार करू शकतात. त्या समूहातील प्रत्येक व्यक्तीने आपापली यादी तयार करून एकाकडे सुपूर्द करायची. त्यांनी सगळ्यांची गोळाबेरीज करून त्याची ऑर्डर ग्राहक पंचायतीच्या कार्यालयात द्यायची. ग्राहक पंचायत दर्जेदार, स्वच्छ, योग्य किमतीतला, साफसुथरा, वजनात कुठलेही घट नसलेला पॅकबंद माल या ग्राहकांच्या चमूकडे पाठवणार आणि ग्राहकाने तो आपला आपणच वितरित करून आपल्या घरोघरी घेऊन जायचा अशी ही संकल्पना होती.
थोडक्यात सहकारातून ही चळवळ वाढवायची हा हेतू होता. हळूहळू ग्राहकांच्या चमूंचा सहभाग वाढू लागला. मुंबई शहर आणि उपनगरातील वेगवेगळ्या सहकारी सोसायटीतले ग्राहक एकत्र येऊन अशा प्रकारचा गट स्थापन करू लागले आणि मालाची ऑर्डर देऊ लागले. मुंबईतला प्रतिसाद पाहून हळूहळू १९९३ मध्ये ठाणे, २००४ मध्ये पालघर, २००८ मध्ये रायगड, २००९ मध्ये वसई आणि २०१८ मध्ये पुणे अशा एकूण सहा ठिकाणी ग्राहक संघ स्थापन करून दरमहा वाटप सुरू झाले. आज या सहा वितरण केंद्रांतून अंदाजे ३० हजार कुटुंबांना “ना नफा, ना तोटा” तत्त्वावर वितरण केले जाते. या मासिक वितरणामध्ये गहू, तांदूळ, डाळी, कडधान्य, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंबरोबरच साबण, चहा, तूप, साठवणुकीचे हळद, तिखट या वस्तू असतातच त्याशिवाय लोकप्रिय पुस्तक, कुकर, झाडू, रुमाल, सतरंजी अशा वस्तूंचेही वाजवी दरात वितरण केले जाते.
दर महिन्याच्या वाटपाच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळू लागल्यानंतर ग्राहक पेठ भरवण्याचं ठरवण्यात आलं. ग्राहक पेठेचा दुहेरी हेतू होता एक तर मराठी लघुउद्योजकांना बाजारपेठ मिळवून देणे आणि ग्राहकांना एकाच ठिकाणी वाजवी दरामध्ये दर्जेदार आणि स्वदेशी माल मिळणे. उत्पादक, विक्रेते आणि ग्राहकांना एका व्यासपीठावर आणून ग्राहकाभिमुख व्यवहार कसा करता येतो? याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. उत्तम दर्जा, रास्त किंमत, पावतीचा आग्रह, किमतीची घासाघीस नाही, फसवे सेल, फ्री फुकटचा भूलभुलैया नाही आणि विक्रीपश्चात ग्राहकाभिमुख सेवा अशा इतरत्र कुठेच नसलेल्या वैशिष्ट्यांमुळे पंचायत पेठांनी ग्राहकांची विश्वासार्हता मिळवली. मुंबईसह, ठाणे, पालघर, पुणे, वसई, दापोली, अलिबाग, नाशिक अशा बारा ठिकाणी पंचायत पेठा दरवर्षी भरतात. आज ऑनलाइन वस्तू उपलब्ध असून सुद्धा ग्राहक पेठामध्ये ग्राहकांची भरपूर गर्दी होते. याचे कारण वाजवी दरामध्ये आणि वैविध्यपूर्ण अशी उत्पादन ग्राहक पेठेत पाहायला मिळतात. मुंबई ग्राहक पंचायतीवर ग्राहकांचा विश्वास असल्यामुळे इथल्या उत्पादनांची चांगली खरेदी होते.
घरोघरी मासिक वितरण, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी ग्राहक पेठा भरवत असतानाच ग्राहकांमध्ये त्यांच्या हक्कांची जाणीव निर्माण व्हावी यासाठी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच ग्राहक शिक्षण देण्याचं काम सुद्धा मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे एकीकडे सुरू होते. संस्थेची सुरुवात झाल्यानंतर लगेचच वर्षभरात “ग्राहक पत्रिका” हे मासिक दरमहा आपल्या सदस्यांना वाण सामानासोबत मोफत वितरीत करून दिले जाते. यातून ग्राहकांसंबंधीचे वेगवेगळे कायदे तसंच एखाद्या ग्राहकांची फसवणूक झाली असेल तर ती केस स्टडी, फसवणूक झाल्यानंतर कशा प्रकारे न्याय मागायचा?, पर्यावरण त्याशिवाय नवीन स्थापन झालेले गट यांची माहिती सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचू लागली.
ग्राहकांसाठीचे कायदे अस्तित्वात आल्यानंतर ग्राहकांच्या बाजूने लढण्यासाठी ग्राहक न्यायालयात कार्यकर्ते वकिलाची भूमिका बजावत असतात. आतापर्यंत असंख्य ग्राहकांना ग्राहक न्यायालयाच्या माध्यमातून मुंबई ग्राहक पंचायतीने दिलासा दिला आहे. सामान्य न्यायालयांमध्ये एखादी केस चालायला दहा दहा वर्षे लागतात, त्या केसचा निकाल ग्राहक न्यायालयामध्ये कमी वेळात लागतो. तसेच त्याला खर्चही कमी येतो. त्यामुळे ग्राहक न्यायालयांची उपयुक्तता महत्त्वाची ठरते. केवळ एकल ग्राहकच नाही, तर मोठमोठ्या कंपन्यांविरुद्ध सुद्धा मुंबई ग्राहक पंचायतीने लढे दिले आहेत. संस्थेने अनेक न्यायालयीन लढे लढलेत आणि यशस्वी करून ग्राहकांचे मोठ्या प्रमाणावर संरक्षण केले आहे.
ग्राहक पंचायत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे हे ठोस काम पाहून शासनाच्या अनेक समित्या तसेच ग्राहक न्यायालये आणि वीज ग्राहक मंचांवरही पंचायतीचे सदस्य ग्राहकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. ग्राहकांची फसवणूक होण्याचं महत्त्वाचं कारण जाहिराती असतात. वाढवून चढवून उत्पादनाचं कौतुक केलेलं असतं किंवा एखादी समस्या पूर्णपणे सुटेल असे आश्वासन दिलेलं असतं. अशा फसव्या जाहिराती विरोधातही ग्राहक पंचायतीने स्वतःहून आवाज उठवला आहे. मद्याच्या फसव्या जाहिराती, अश्लील वा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरुद्ध वेळोवेळी आवाज उठवून या आक्षेपार्ह जाहिराती मागे घ्यायला संबंधितांना भाग पाडले आहे.
कोविड काळात रद्द झालेले विमान प्रवास आणि देश- विदेश सहली या विरुद्ध सुद्धा संस्थेने कायदेशीर लढे दिले आणि देत आहे. त्यातले अनेक लढे गाजले आहेत. पर्यटन कंपन्यांनी ग्राहकांचे पैसे परत द्यायला टाळाटाळ केली होती, त्यांच्याविरोधात लढा देऊन ग्राहकांना पैसे परत मिळवून दिले आहेत. ग्राहकांच्या फसवणुकीचा आणखी एक मोठा प्रकार बांधकाम व्यावसायिकांकडून होतो आणि ही फसवणूक तर खूप मोठ्या आकड्याची असते. ग्राहक आपलं सर्व संचित एखादी जागा घेण्यासाठी लावतो आणि बांधकाम व्यावसायिकांकडून त्यांची फसगत होते, याची राज्य शासनाने नोंद घेतली होती आणि यासाठी काही वर्षांपूर्वी ग्राहक संरक्षण कायदा, रेरा कायदा निर्मिती झाली होती. या कायद्याच्या निर्मिती तसंच सुधारणेसाठी संस्थेचे योगदान लक्षणीय राहिले आहे.
joshishibani@yahoo. com
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…