राज ठाकरेंची मोठी घोषणा!
मुंबई : या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. म्हणूनच केवळ मोदींसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले. मला राज्यसभा नको आणि विधानपरिषद नको, जागा वाटपाची वाटाघाटी नको, असेही ठाकरे यांनी जाहीर केले. मनसे लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे राज ठाकरे यांच्या भाषणातून स्पष्ट होत आहे.
दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज (९ एप्रिल) रोजी गुढी पाडवा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कुणाशीही युती नाही, जे करायचं ते स्वबळावर, असा निर्धार करणाऱ्या राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादीसोबत महायुतीत सहभागी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मोदींना आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केला.
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र कर भरतो. तेवढाच निधी वाट्याला यावा, अशी अपेक्षा आहे. येणारी निवडणूक या देशाचे भविष्य ठरवणार आहे. अनेक निवडणुका येतील. विधानसभा निवडणुका येतील. त्यामध्ये काय होईल? मी इथेच गेल्यावर्षी सभेत महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला आहे, असे मी आधी सांगितले होते. कोणती सोंगटी कुठे पडलीये माहिती नाही. माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी जीन्स घालून ट्रॅक्टरवर बसलेला हवा आहे. सर्वात तरुण देश आज भारत आहे. सर्वाधिक तरुण ना अमेरीका आहे ना जपान आहे. या तरुण तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने काम केले पाहिजे. उद्योगपतींनी देश सोडून जाऊ नये. १० वर्षानंतर देश म्हातारा व्हायला लागेल. तरुणांकडे मोदींनी लक्ष दिले पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी जे ऐकत होतो. ते ५ वर्षात दिसत नाहीये. ज्या गोष्टी मला पटलेल्या नाहीत ते पटलेल्या नाहीत. ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्याच कौतुक करणार नाही आवडल्या तर टीका करणार आहेच. माझा राग टोकाचा आहे. महाराष्ट्रातील लोकांवर, मराठी माणसावर , मराठी भाषेवर टोकाचे प्रेम करतो. मात्र, मला तशी गोष्ट दिसली नाही तर स्वत: विरोध करतो. ३७० कलम रद्द झाले तेव्हा अभिनंदन केले. ज्या गोष्टी चांगल्या घडल्या त्याच अभिनंदन केले. मी कधीही व्यक्तीगत टीका करतो. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत नरेंद्र मोदींवर व्यक्तीगत टीका करतात. मी तशी केली नाही. तुमचा पक्ष फोडला म्हणून तुम्ही आरोप करता, पण सत्तेत असताना तुम्ही मलाई खाल्ली नाही का, असा सवाल देखील राज यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.
राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बिघडलेली असताना आपल्याला यातून पुढे जाण्यासाठी मार्ग काढायचा आहे. मनसे महाराष्ट्राला योग्य मार्ग दाखवेल. मात्र माझी महाराष्ट्रातील मतदारांना आणि जनतेला ही विनंती आहे की, कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. जे राजकारण सध्या राज्यात सुरू आहे. त्याला राजमान्यता मिळत गेली तर पुढचे दिवस भीषण येतील.
त्यामुळे पुढच्या पाच वर्षांचा विचार करता. मी देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं की, मला कोणत्याही वाटाघाटी नको. मी त्यांना सांगितलं की, मला राज्यसभा ही नको विधानपरीषद ही नको. पण या देशाला चांगल्या आणि खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा माझा पक्ष राज्यातील महायुती म्हणजेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, असल्याचे राज ठाकरे यांनी घोषित केले.
लोकसभा निवडणुकीसाठी जास्त इच्छुक नाहीत. पण ते विधानसभा निवडणुकीत महायुतीत असणार असल्याचे संकेत राज यांनी दिले आहेत. कारण त्यांनी मनसैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत त्यांच्या या भुमिकेमुळे विधानसभा निवडणुकांमध्ये अधिक रंगत येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्याआधी राज ठाकरे यांनी अमित शाहांची भेट घेतली. ही राजकीय भेट असल्याचं सांगण्यात येत होतं. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये निवडणुकीबाबत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, तुम्ही आमच्या चिन्हावर निवडणूक लढवा, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, माझ्या पक्षाचं चिन्ह रेल्वे इंजिन असून ते कार्यर्त्यांनी कमावलेलं आहे, ते आयात केलेलं नाही. चिन्हाबाबत तडजोड होऊ शकत नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. जागावाटपावर चर्चा झाली पण 1995 साली मी शेवटच्या जागावाटपाच्या चर्चेवर बसलो होते त्यानंतर कधीच बसलो नाही. तू दोन घे.. तीन घे.. मला ही दे.. असं मला जमत नसल्याचंही राज ठाकरेंनी थेट सांगून टाकले.
शिवसेनेचा नाही तर मी मनसेचाच अध्यक्ष राहणार
मी कोणत्याही शिवसेनेचा नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठासून सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल अनेक अफवांना ऊत आला होता. राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष होणार असल्याचे बोलले जात होते. त्यावर बोलताना राज ठाकरेंनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
राज ठाकरे म्हणाले, मी दिल्लीत अमित शाहांच्या भेटीला गेलो, तेव्हापासूनच चक्र सुरु झालं. मी दिल्लीला शाहांच्या भेटीला गेलो हे विरोधकांना कसं कळलं? मला तिथं थांबण्याची वेळ आली नाही तर माझी भेट ही दुसऱ्या दिवशी होती, मी आदल्या दिवशीच दिल्लीत पोहोचलो होतो.
माध्यमांमध्ये त्यांच्या मनाप्रमाणे बातम्या चालवण्याचं काम सुरु असतं. दिल्लीतही पत्रकारांना सांगितलं की मला निवडणूक लढवायची असेल तर मी सांगूनच लढवणार आहे. मला जर शिवसेनेचा अध्यक्ष व्हायचं असतं तर तेव्हाच झालो नसतो का? मी बाळासाहेबांशिवाय कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. मी जन्माला घातलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितले.