
मुंबई : चैत्र पाडव्याला आपण घरोघरी गुढी उभारुन मराठी नववर्षाला मोठ्या उत्साहात सुरुवात करतो. यावेळी पुरणपोळीचा बेत आखला जातो. त्यासोबतच कडुलिंबाच्या पानाचाही नैवेद्य दाखवला जातो. कडुलिंबाची पाने आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचे सेवन केले जाते. मात्र सायंकाळी गुढी उतरवल्यानंतर कडुलिंबाचा पाला फेकून न देता त्याचा 'असा' वापर तुम्ही करु शकता. (Neem Leaves Uses)
'वर्षाची सुरुवात कडू झाली तरीही शेवट मात्र गोड व्हावा' या संदेशामार्फत गुढीपाडव्याच्या नैवेद्यातून कडुलिंबाची कोवळी पाने, गूळ, साखर, जिरे, मिरे, हरभऱ्याची डाळ, ओवा, हिंग, धने, मीठ यांचे मिश्रण करुन प्रत्येकाला प्रसाद म्हणून खायला देतात. यामुळे शरीर तेजस्वी व निरोगी बनते तसेच दुर्धर व्याधी दूर होतात.
कसा कराल कडुलिंबाच्या पानांचा वापर?
- शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी चंदनाच्या खालोखाल कडुलिंबाच्या पानाचा गंध उगाळून सर्वांगाला लावू शकतो किंवा अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाचा पाला टाकून स्नान केले जाते. यामुळे त्वचेवर येणारे पिंपल्स आणि शरीरावर येणारी खाज अशा समस्या दूर होतात.
- बाळंतिणीने कटुलिंबाच्या पानांचा रस प्यायल्याने बाळंतरोग होत नाही.
- बाथरूममधील दुर्गंधी दूर करण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या फ्रेशनरऐवजी तुम्ही कडुलिंबाची पाने वापरू शकता.
- कपाटात असणाऱ्या ओल्या कपड्यांमधून दुर्गंधी येऊ नये म्हणून नेफ्थलीन बॉल्सचा वापर केला जातो. मात्र त्याऐवजी कडुलिंबाची पाने उपयुक्त ठरू शकतात.
कडुलिंबांच्या पानांचा प्रसाद
कडुलिंबाची पाने आरोग्यासाठी उपयुक्त असतात, आजार कित्येक मात्र उपाय एक म्हणून कडुलिंबांच्या पानांचा वापर केला जातो. शरीरासाठी गुणकारक असणाऱ्या कडुलिंबाच्या पानांचा प्रसादही बनवला जाऊ शकतो. हरभरा डाळ ४-५ तास स्वच्छ पाण्यात भिजत ठेवावी. नंतर कडुलिंबाचा पाला स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यात हरभरा डाळ, कडुलिंबाची पाने, जिरे, ओवा, वाळलेलं खोबरे, गुळ किंवा साखर आणि चिंच एकत्र करुन बारीक करुन घ्यावे. मिश्रण तयार झाल्यानंतर आवडीनुसार मध घालून कडुलिंबाच्या पानांचा प्रसाद तयार होतो.