
पारंपारिक वेशभूषेत महिला पुरुषांचा सहभाग
महाड : गुढीपाडव्याला अनेक ठिकाणी भव्य शोभा यात्रा निघतात. ढोल ताशा पथके तसेच ध्वज पथके आणि पारंपरिक मराठमोळा लुक केलेला असतो. तसेच गुढी पाडव्या निमित्त आज छत्रपती श्री संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव समिती, किल्ले रायगड व समस्त महाडकरांच्या वतीने महाडमध्ये भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता महाडची ग्रामदेवता श्री जाकमाता देवी च्या मंदिरापासून या शोभा यात्रेला प्रारंभ करण्यात आला. श्री रामाची पालखी व कटेवरी हात ठेवून उभा असलेल्या सावळ्या विठ्ठलाची भव्य प्रतिकृती सजवलेल्या गाडीवर उभी करण्यात आली होती.
त्यापुढे पारंपारिक वेशभूषा परिधान केलेल्या महिलांची बाईक रॅली, पुरुष महिलांचे लेझीम पथक सहभागी झाले होते. संपूर्ण बाजारपेठेतून ही शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले हे सपत्नीक, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, शिवसेनेच्या महाड शहर महिला आघाडी प्रमुख विद्या देसाई यांसह विविध पक्षांचे महिला व पुरुष पदाधिकारी सहभागी झाले होते.