दिग्दर्शक नितेश तिवारी ‘या’ कारणामुळे खूप चिंतेत
मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा त्याच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आगामी ‘रामायण’ चित्रपटासाठी चर्चेत आहे. यात तो रामाची भूमिका साकारणार आहे. या बिग बजेट सिनेमासाठी ११ कोटी रुपये खर्चून अयोध्येचा सेट बनवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मात्र सिनेमाच्या सेटवरील काही फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सिनेमाच्या टीमकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसताना अनधिकृतपणे हे फोटोज व्हायरल होत आहेत. त्यामुळे हे रोखण्यासाठी सिनेमाच्या टीमने एक नियम तयार केला आहे. यापुढे ‘रामायण’च्या सेटवर सर्व कलाकार व क्रू मेंबर्सना मोबाईल बंदी असणार आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोज व व्हिडीओजमुळे चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी खूप चिंतेत आहेत. त्यामुळे त्यांनी सेटवर ‘नो फोन पॉलिसी’चे पालन करण्यास चित्रपटाच्या टीमला सांगितले आहे. शूटिंग सुरू झाल्यावर अतिरिक्त कर्मचारी आणि क्रूने सेटवरून बाहेर पडावे, असा नियमदेखील तिवारी यांनी चित्रपटाच्या टीमसाठी बनवला आहे. फक्त आवश्यक कलाकार आणि तंत्रज्ञ सेटवर थांबू शकणार आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सेटवरील एका फोटोमध्ये अरुण गोविल हे दशरथ राजाच्या भूमिकेत दिसले. तर अभिनेत्री लारा दत्ता ही कैकेयीच्या भूमिकेत दिसली. अभिनेत्री शीबा चड्ढा यादेखील दिसल्या होत्या. यानंतर आता दिग्दर्शकांनी ठोस पावले उचलत चित्रपटाच्या टीमसाठी नियम जाहीर केले आहेत.