- अर्थभूमी : उमेश कुलकर्णी
एलन मस्क यांची टेस्ला या विद्युत वाहन बनवणाऱ्या कंपनीचा प्रकल्प येत्या काही महिन्यांत भारतात सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भारतीय कार मार्केटवर चांगलाच परिणाम होणार आहे आणि तो सकारात्मक असेल. सध्या भारतीय बाजारात इव्हीचा वाटा २.४ टक्के आहे. पण त्यात आता वाढ होणार आहे. टेस्लाची एक टीम भारतात येणार असून, ती प्रकल्प सुरू करण्यासाठी जागा शोधणार आहे. टेस्लाच्या आगमनाने भारतीय कार मार्केटमध्ये क्रांती होण्याची शक्यता आहे कारण आयातीमध्ये इव्हीकारवर लावणाऱ्या करात महत्त्वपूर्ण कपात करण्यात येईल. याचा लाभ केवळ टेस्लालाच नव्हे तर इतर इव्ही आणि पेट्रोलवर चालणाऱ्या कार्सनाही होणार आहे. त्यांच्यासाठीही करात कपात लागू होईल. टेस्लाचा सर्वात मोठा स्पर्धक टाटा मोटर्स आहे. टाटा मोटर्सने टेस्लाला करात सवलत देण्यास जोरदार विरोध केला होता.
पंतप्रधान मोदी यांनी टेस्लाचे एलन मस्क यांना भारतात प्रकल्प सुरू करण्याची विनंती केली होती. आता टेस्लाच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली आहे. टेस्लाच्या गुंतवणूक प्रक्रिया गतीमान करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने आवश्यक त्या परवानग्या आणि इतर प्रक्रिया सुरू केल्या आहेत. टेस्लाला करात कपात करण्याच्या बदल्यात मोदी सरकारने भारतातच प्रकल्प सुरू करण्याची अट घातली असून, त्यासाठी किमान गुंतवणूक ५०० कोटी रुपयांची ठेवली आहे. टेस्लाच्या आगमनाने भारतातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होणार असून भारतातील हजारो युवकांना नोकऱ्या दिल्या जातील. पंतप्रधान मोदी यांची ही आवडती योजना असून टेस्लाचा प्रकल्प भारतात येण्यास दीर्घ काळापासून प्रतीक्षा करावी लागली होती. पण आता दीर्घप्रतीक्षेनंतर टेस्ला कार प्रकल्प भारतात पुढील वर्षी येण्याची सारी सिद्धता झाली आहे. अगोदरच भारतीय अर्थव्यवस्था तेज झाली असून, भारताचा आर्थिक विकासाचा दर ६.७ टक्के राहील असा अंदाज अनेक रेटिंग एजन्सीजनी व्यक्त केला आहे. पण टेस्लाच्या आगमनाने भारतात गुंतवणूक करण्यास इतरही इव्ही आणि कार कंपन्यांना प्रोत्साहन मिळेल, असा अंदाज आहे. सहसा भारतात कंपन्यांना येण्यासाठी असंख्य परवानग्या लागतात आणि सरकारी यंत्रणा कमालीची सुस्तपणे काम करते. पण टेस्लाच्या बाबतीत खुद्द पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाने संबंधित विभागांना सारी प्रक्रिया झटपट पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने सरकारी यंत्रणाही वेगाने हालचाल करत आहे. टेस्लाच्या भारतातील आगमनाने भारतीय कार बाजारपेठेवर परिपक्वतेचा शिक्का मारला जाईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिका आणि चीननंतर सर्वात मोठी कार बाजारपेठ भारतातच आहे. त्यातच भारताचा आर्थिक विकासाचा दर सातत्याने वाढता असल्याने कार ग्राहकांची संख्या प्रचंड वाढली आहे. टेस्लाला भारतात प्रवेश करण्याने फार मोठा लाभ होणार आहे कारण टेस्लाला चीनमध्ये इव्ही वाहनांची प्रचंड स्पर्धा आहे. त्यांना चीनमधून आता व्यवसाय मिळत नसल्याने टेस्ला दुसऱ्या बाजारपेठेच्या शोधातच होती. टेस्लाला आयात शुल्कात सवलत दिली, तर इतर इव्ही कार कंपन्यांना द्यावी लागेल. त्यामुळे इतर इव्ही कार कंपन्यांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. टेस्लाला आयात शुल्कात कपात देण्यास टाटा मोटर्सने मोठा विरोध केला होता.
पाश्चात्त्य कंपन्यांची मागणी घटल्याने संकटाशी लढत असताना टेस्लाला भारतातील बाजारपेठ चांगले तारण्याची शक्यता आहे. भारतात आपल्या इव्ही कार्स विकण्यास अमेरिकन कंपनीला आकर्षक भवितव्य दिसत आहे. सुरुवातीला टेस्ला भारतात संपूर्ण बांधणी केलेल्या आयातीत कारची निर्मिती करणार आहे. टेस्लाला भारताकडून कार आयात शुल्कात सवलत देण्याच्या मुद्द्यावर भारतातील कार उद्योगात खळबळ उडाली होती. अनेक कार कंपन्यांनी टेस्लाला ही सवलत देऊ नये, अशी मागणी केली होती. टेस्लाला भारतात येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. त्यासाठी एलन मस्क यांना खूप यातायात करावी लागली. या वर्षीच्या जूनमध्ये पंतप्रधान मोदी यांना एलन मस्क भेटले आणि त्यांनी असे सांगितले होते की, लवकरात लवकर टेस्लाचे उत्पादन भारतात सुरू होऊन ती विक्रीसाठी उपलब्ध असेल. त्यानंतर कार कंपनीने सांगितले की भारतात कारसारख्या उत्पादनांवर सर्वाधिक कर लावला जातो. मोठ्या देशातही इतका लावला जात नाही. भारतातील सध्याची कारवरील शुल्क व्यवस्था आहे, ती विद्युत वाहने आणि इतर हायड्रोकार्बनवर चालणाऱ्या कार यात मतभेद करत नाही. टेस्ला आणि भारतीय अधिकारी यांच्यात अनेक चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या तरीही मुद्दा सुटत नव्हता. टेस्लाने भारतातील स्थानिक बाजारपेठेत उत्पादन सुरू करावे, ही भारताची प्रमुख अट होती. आयात शुल्कात जबरदस्त सूट दिली तर भारतीय कंपन्या येथे कार आयात करण्यावर भर देतील आणि मग येथे रोजगार निर्मितीच्या हेतूने कार प्रकल्प सुरू करण्याचा इरादा कोसळून पडेल, अशी शंका भारताला होती. भारतात सध्या आयातीत कारवर शंभर टक्के आयात शुल्क लावले जाते आणि त्यात विमा आणि मालवाहतुकीचा दर हे अंतर्भूत असतात. २०२१ मध्ये टेस्लाने संपूर्ण भारतात बनवलेल्या कारवर ४० टक्के सूट द्यावी, अशी मागणी केली होती.
ऑगस्टमध्ये भारताने असे धोरण ठरवले की जी वाहन कंपनी स्थानिक उत्पादनाची अट मान्य करेल, तिला आयात शुल्कात सूट देण्यात येईल. यामागे हेतू हा होता की भारतात गुंतवणूक वाढून रोजगार निर्मिती वाढावी. येथील तरुणांना रोजगार मिळावा, हाच स्तुत्य हेतू पंतप्रधान मोदी यांचा होता. ज्या वाहनांमध्ये स्वच्छ ऊर्जा वापरली जाते, त्यांना कमी आयात शुल्क असावे, याची सुनिश्चिती सरकारने केली. ही सूट टेस्लालाच लागू असेल असे नव्हे, तर ज्या कार कंपन्या भारतात रोजगार निर्मितीच्या दृष्टीने प्रकल्प सुरू करतील, त्यांना कमी आयात शुल्क असेल. कमी आयात शुल्काच्या बदल्यात टेस्ला सुरुवातीला भारतात प्रकल्प सुरू करून स्थानिक उत्पादन वाढवण्याचे वचन देण्याची शक्यता आहे. आता टेस्लाची एक टीम भारतात येणार असून महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू यापैकी एका ठिकाणी टेस्ला प्रकल्पासाठी जागा शोधणार आहे. भारतीय कार मार्केटमध्ये टेस्लाच्या आगमनाने खळबळ उडाली.