अपघातात गंभीर जखमी झालेली 3 वर्षीय मुलीची प्रकृती चिंताजनक
नवी मुंबई(प्रतिनिधी): बोकडविरा गावाकडून उरणच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव क्रेटा कारने समोरुन येणाऱ्या स्कुटीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात स्कुटीवरील दाम्पत्याचा मृत्यू तर त्यांची 3 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री उरण रेल्वे स्टेशनजवळ घडली. या अपघातानंतर क्रेटा कार चालक पळून गेला असून उरण पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
या अपघातात मृत झालेल्या दाम्पत्याचे नाव पवित्र मोहन बराल (४०) व रश्मिता पवित्र बराल (३७) असे आहे. या अपघातातील मृत बराल दाम्पत्य उरण मधील बोरी पाखाडी भागात मागील अनेक वर्षापासून राहण्यास होते. शनिवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास बराल दाम्पत्य आपल्या ३ वर्षीय मुलगी परी सोबत स्कुटीवरुन उरणकडुन बोकडविराकडे कामानिमित्त जात होते. यावेळी त्यांची स्कुटी उरण रेल्वे स्टेशन जवळ आली असताना बोकडविराकडुन उरणच्या दिशेने जाणाऱया भरधाव क्रेटा कार चालकाने त्यांच्या स्कुटीला समोरुन जोरात धडक दिली.
ही धडक इतकी जबरदस्त होती, की त्यामुळे स्कुटीचे दोन तुकडे होऊन स्कुटीवरील बराल दाम्पत्यासह त्यांची तीन वर्षाची मुलगी दूरवर फेकले गेले. या भीषण अपघातात तिघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पवित्र व त्यांची पत्नी स्मिता या दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात बराल दाम्पत्याची ३ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला बेलापूर येथील अपोलो हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या अपघातातील क्रेटा कारचा चालक जय चंद्रहास घरत याने आपल्या हातून अपघात घडल्या नंतरही रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या तिघांना मदत तर केली नाहीच उलट त्याने रेल्वेच्या आरपीएफ जवाना सोबत हुज्जत घातली. तसेच त्यांच्या वर्दीची कॉलर पकडून शिवीगाळ करीत मारहाण केली आहे. यानंतर घटनास्थळावरुन पलायन केले. याप्रकरणी आर पी एफ चें जवान अतुल चौहान यांनी उरण पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीसांनी आरोपी जय चंद्रहास घरत याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.आरोपी कार चालक हा नशेत असल्याने हा अपघात घडला असल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी सांगितले.