आठवडाभर पर्यटकांचे हाल; तर स्टॉल धारकांचेही आर्थिक नुकसान
मुरुड : मुरुड खोरा बंदरात अचानक फेरी बोट सेवा बंद झाल्याने जंजिरा किल्ला पाण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे आठवडाभर प्रचंड हाल झाले आहेत. या ठिकाणी पर्यटन व्यवसाय करणाऱ्या स्टॉल धारकांचे आर्थिक नुकसान होत आहे. फेरी बोट व्यावसायिक व बंदर अधिकारी यांच्यामध्ये ताळमेळ होत नसल्याने ही फेरी बोट सेवा बंदर अधिकाऱ्यांनी बंद केल्याचे समजते.
जगप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. राजपुरी येथे फेरी बोट सेवेवर प्रचंड प्रमाणात ताण पडत असल्याने एकदरा खोरा बंदरात फेरी बोट सेवा सुरु करण्यात आली आहे. या ठिकाणी पर्यटकांच्या सेवेसाठी जेटीचा विस्तार करण्यात येत आहे. खोरा बंदराचा ही विस्तार करण्यात येत आहे.
हे सर्व सुरू असताना या ठिकाणी खोरा बंदर ते जंजिरा किल्ला अशी फेरी बोट सेवा सुरु आहे. या एकदरा गावातील स्थानिक ग्रामस्थांनी मिळून माऊली कृपा पर्यटक जलवाहतूक सहकारी संस्था स्थापन केली. बंदर खात्याच्या सर्व प्रकारच्या परवानग्या व परवाने मिळवून कर्ज काढून दागदागिने गहाण ठेवून नवीन बोट तयार केली. २ मार्चला या बोटीचे उद्घाटन करण्यात आले. परंतु या बोटीला शेवट नंबर असल्याने एक महिना उलटून गेला तरी देखील फेरी मिळत नसल्याने मोठा आर्थिक नुकसान सोसावे लागलत आहे.
नंबर प्रमाणे फेरी बोट सेवा सुरू करावी अशी मागणी माउली कृपा पर्यटक जलवाहतूक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. परंतु आधीपासून सुरू असलेल्या फेरीबोट मालकांच्या आडमुठे पणामुळे नंबर देत नसल्याने स्थानिकांच्या बोटीला नंबर मिळत नाही. यासंदर्भात बंदर अधिकाऱ्यांना वारंवार सांगितले तरीही ते दुर्लक्ष करीत असल्याने या बोटीला फेरी मिळत नाही.
नंबर मिळत नसल्याने स्थानिक भूमिपुत्रांनी २२ मार्च रोजी एम. एम. बी. च्या अलिबाग कार्यालयात जाऊन उपसंरक्षक तथा प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सी. जे. लेपांडे यांना विनंती केली की गेले महिनाभर आम्हाला नंबरच मिळत नाही तरी सर्व नंबर हे राऊंड पद्धतीने करण्यात यावे जेणेकरून सर्वांना नंबर मिळेल. या विनंतीला मान देऊन लेपांडे यांनी त्याच दिवशी एक एप्रिलपासून राऊंड पद्धतीने फेरी बोट सुरू करण्याचे पत्रद्वारे खोरा बंदर अधिकारी यांना कळविण्यात आले होते.
खोरा बंदर अधिकारी राहुल हे फेरी बोट वाल्यांचे म्हणणे ऐकून घेतच नाहीत त्यामुळे त्यांनी सर्वच बोटी बंद केल्या आहेत. एक एप्रिल पासून फेरी बोट सेवा बंद असल्याने फेरीबोट वाल्यांचे आर्थिक नुकसान होत आहे व या बंदरात पर्यटन व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
या ठिकाणी येणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांना परतावे लागत आहे. त्यामुळे पर्यटकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तरी बंदर अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा व या ठिकाणी असलेल्या फेरीबोटींना नंबर प्रमाणे फेरी द्यावी व सध्या पर्यटक प्रमाण कमी असल्याने या ठिकाणी असलेल्या आठ बोटींना एका दिवसात फेरी होत नाही. जर पहिल्या दिवशी तीन किंवा चार बोटीने फेरी मिळाली तर उर्वरित चार बोटींना दुसऱ्या दिवशी फेरी द्यावी व पुन्हा तिसऱ्या दिवशी पहिल्या बोटीने फेरी द्यावी अशा प्रकारे निर्णय घेतला तरच या फेरीबोट वाल्यांचे प्रश्न मार्गी लागतील व आर्थिक नुकसान होणार नाही.