Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडीIPL 2025

RR vs RCB: राजस्थानसाठी गेम चेंजर ठरले बटलरचे शतक

RR vs RCB: राजस्थानसाठी गेम चेंजर ठरले बटलरचे शतक

मुंबई: राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२४मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हरवत सलग चौथा विजय मिळवला. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात राजस्थानने बंगळुरूला ६ विकेटनी हरवले. राजस्थानला हा सामना जिंकून देण्यात जोस बटलरचे शतक महत्त्वाचे ठरले. आव्हानाचा पाठलाग करताना सलामीसाठी उतरलेल्या जोस बटलरने ५८ बॉलमध्ये ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १०० धावांची खेळी केली.


गेल्या तीन सामन्यात बटलर काही खास करू शकला नव्हता. तीन सामन्यांत त्याची धावसंख्या अनुक्रमे, ११, ११ आणि १३ इतकी होती. मात्र बंगळुरूविरुद्ध त्याने जबरदस्त खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. यशस्वी जायसवालची विकेट झटपट पडल्यानंतर जोस बटलरने आक्रमक खेळी करत शतक ठोकले.


कर्णधार संजू सॅमसनने बटलरची चांगली साथ दिली. संजूने ४२ बॉलमध्ये ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६० धावांची खेळी केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी केली. यामुळे राजस्थानचा विजय सुकर झाला.



बटलरने कोहलीच्या शतकावर फिरवले पाणी


सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या बंगळुरूसाठी विराट कोहलीने ७२ बॉलमध्ये १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ११३ धावांची खेळी केली होती. मात्र जोस बटलरने विजयी शतक ठोकत कोहलीच्या या खेळीवर पाणी फिरवले.


सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना आरसीबीने २० षटकांत ३ बाद १८३ धावा केल्या होत्या. संघासाठी कोहलीने सर्वात मोठी खेळी केली. याशिवाय कर्णधार फाफ डू प्लेसिसने ३३ बॉलमध्ये २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४४ धावा केल्या होत्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारीही रचली. मात्र आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानने १९.१ षटकातच विजय आपल्या नावे केला.

Comments
Add Comment