- विशेष : श्रद्धा रणनवरे
प्रचलित रूढीवादी परंपरा झुगारून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पहाडी गर्ल्स नावाच्या सात महिलांच्या गटाने आफ्रिका खंडातील टांझानियामधील जगातील सर्वात उंच पर्वत शिखर सर केले. त्याची उंची १९ हजार ३४१ फूट आहे.
पन्नास वर्षांच्या आसपास तसेच आपापल्या क्षेत्रात प्रथितयश असणाऱ्या या सातजणी मध्ये-गीता रामास्वामी, सविता पांढरे, श्रद्धा रणनवरे, विजया भट, सुभाषिनी श्रीकुमार, सिमा बिजू या सर्वजणी मुंबईच्या महिला आहेत. तर रीमा गुप्ता या हैदराबादच्या आहेत. या सर्वजणी पिंक्याथोन या मुंबईतील महिलांसाठी फिटनेस ग्रुपच्या सभासद असून धावण्याच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. त्यांचा जीवनाकडे बघण्याचा समान दृष्टिकोन, प्रेम, साहसी भावना या गुणांमुळे एकत्र येऊन जीवनाकडे अधिक व्यापक व सहासी दृष्टिकोनातून बघण्यासाठी आणि आपल्या सहासी वृत्तीच्या कक्षा रुंदावण्यासाठी पहाडी गर्ल्स बनल्या.
वय, लिंग या पारंपरिक वृत्तींना झुगारून त्यांनी मग हिमालयातील गिरी शिखरांना साद घालत, एव्हरेस्ट बेस कॅम्प, कांचनजंगा पाठोपाठ गोयचाला ही गिरीशिखरे सर केली. त्यानंतर त्यांनी आपापल्या शारीरिक क्षमतेला आव्हान द्यायचे ठरवले व काहीतरी हटके-ये दिल मांगे मोअर, या उक्तीप्रमाणे टांझानियामधील किलीमंजारो पर्वताची निवड केली. आफ्रिकेतील किलीमंजारो या पर्वताचं गिर्यारोहण करण्याचं जगातील अनेक गिर्यारोहकांचे स्वप्न असते.
त्यांनी मुंबई ते टांझानिया प्रवास करून व मार्गदर्शकाशी सल्लामसलत मोहिमेतील सर्व बारकाव्यांचा अभ्यास करून शिखर चढाई सुरू केली. सात दिवसांच्या चढाईमध्ये एका वेळी एकच पाऊल या मंत्राचा वापर करण्याचं ठरवण्यात आलं. ओबडधोबड रस्ते, निसर्गाचे बदलते रूप, ऊन, वारा, बर्फ, पाऊस यांमध्ये स्वतःला सावरण्यासाठी व चालण्याची गती योग्य ठेवण्यासाठी चांगले मार्गदर्शक लाभले.
त्यांच्या या मोहिमेत दिवसाची सुरुवात सकाळी लवकर सुरू झाली. अतिशय थंड वातावरणात चढाईसाठी आम्ही मन मजबूत बनवले. तीन ते पाच थरांच्या कपड्यांचा वापर करावा लागतो. खाण्यापिण्याची काळजी घ्यावी लागते. मानसिक धैर्य सांभाळावं लागतं.
पर्वतारोहण करताना निसर्ग पावलोपावली आपली परीक्षा घेतच असतो. या संपूर्ण प्रवासामध्ये मानसिक, भावनिक व शारीरिक सहनशक्तीची चाचणी घेतली जाते. दररोजची सकाळ एक नवीन वेगळा अनुभव घेऊन येते.
शेवटच्या दिवस हा साडेआठ तासांचा ट्रेक करून जेव्हा त्या स्टेला पॉईंटला पोहोचल्या तेव्हा त्यांना शरीराने विश्रांतीची हाक दिलेली होती. तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, अजून दीड तासांच्या अंतरावर ऊहुरु ह्या शिखरावर जायचं आहे. शारीरिक कष्टाचा मान राखत मानसिक ऊर्जेचा वापर करून एका वेगळ्या भावनेने पछाडलेल्या या महिलांनी तोही खडतर प्रवास पूर्ण केला. त्या ठिकाणी पोहोचल्यावर त्या तेथील उणे १० अंश सेल्सिअस तापमानात उंच शिखरावरून निसर्गातील चित्तथरारक व विलोभनीय असं दृश्य पाहत असताना याच निसर्गाने आम्हाला आमचा थकवा व वेदना विसरायला भाग पाडले.
सर्वात कठीण होता तो बराक्को वॉल ओलांडताना अनुभव. मानसिक धैर्य, योगा यामुळे कोणतीही प्रदीर्घ भीती दूर होते. यावेळेस आम्हाला लाभलेल्या मार्गदर्शकांनी केलेली पर्वतीय गाणी, नृत्य खूपच प्रेरणादायी ठरलं. त्यांचा आत्मविश्वास खूपच दांडगा होता. त्यांच्या चालण्या- बोलण्यातून व कृष्णवर्णीय देहातून माणुसकीचे दर्शन घडले. या शिखर प्रवासा दरम्यान अनेक आव्हाने व अनुभव यांची शिदोरी घेऊन किलीमंजारोवरून आम्ही परत आलो. हा अनुभव खूपच सुखद होता.
जिंकण्यासाठी अनेक पर्वत, अनेक आव्हाने व अनुभव यांची शिदोरी घेऊन कीलीमंजारो वरुन परत आलेल्या या महिला आपल्या पुढील योजनांबद्दल बोलतात की जिंकण्यासाठी अनेक पर्वत आहेत आणि मोजण्यासाठी अधिक उंची आहे. पहाडी मुली पुढे म्हणतात तुम्ही तुमच्या पायाने पर्वत चढता पण आत्म्याने तो जिंकता. या त्यांच्या विश्वासाचा पुनरुच्चार करून त्यांनी त्यावर शिक्कामोर्तबही केले.त्यामुळे त्यांना कीलीमंजारो शिखर सर करताना त्याच विश्वासाची त्यांना मदत झाली. व हे शिवधनुष्य पेलता आलं.