बंगळुरू: कर्नाटकमध्ये एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी पंतप्रधान मोदींसाठी मोठा त्याग केला आहे. त्यांना मोदींचे कट्टर चाहते म्हणून ओळखले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी या व्यक्तीने आपल्या हाताचे बोट कापून कालिमातेला अर्पण केले आहे.
ही घटना शनिवारी समोर आली. कारवार शहरातील सोनारवाडा येथे ही घटना घडली. या व्यक्तीचे नाव अरूण वर्नेकर असे आहे. वर्नेकर यांनी आपल्या घरी पंतप्रधान मोदींचे एक मंदिरही बनवले आहे आणि नियमितपणे ते तेथे पुजा करतात.
आपले बोट कापल्यानंतर त्यांनी आपल्या घराच्या भींतीवर रक्ताने लिहिले की, काली माता मोदी बाबा यांचे रक्षण करा. त्यांनी भींतीवर असेही लिहिले की मोदी बाबा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. तसेच मोदी बाबा सगळ्यात महान असेही लिहिले होते.
मीडियाशी बोलाना अरूण वर्नेकर म्हणाले, पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर चीन आणि पाकिस्तानमुळे होणारा त्रास कमी झाला आहे. मोदी सत्तेत येण्याआधी काश्मीरमधून दहशतवादी कारवाया तसेच जवानांच्या मृत्यूच्या बातम्या येत होत्या मात्र आता तेथे शांतता प्रस्थापित झाली आहे. देशाच्या विकासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींची गरज आहे.
अरूण वर्नेकर याआधी मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होते. सध्या ते कारवार शहरात राहतात आणि आपल्या वृद्ध आईची काळजी घेतात. ते अविवाहित आहेत. याआधीही २०१९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी बोट कापण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो यशस्वी झाला नव्हता.