
३ दिवस 'या' वेळेत अवजड वाहनांना 'नो एन्ट्री'
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) सलग सुट्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी (Traffic Jam) टाळण्यासाठी आजपासून (७ एप्रिल) ते ९ एप्रिलपर्यंत अवजड वाहनांना सकाळी सहा ते दुपारी १२ या वेळेत वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. ही वाहने द्रुतगती मार्गावर कडेला थांबविण्यात येणार आहेत. गैरसोय टाळण्यासाठी अवजड वाहनचालक मालकांनी पुढील तीन दिवस सकाळी ६ ते दुपारी १२ या दरम्यान वाहने रस्त्यावर आणू नयेत, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.
उन्हाळी सुट्टीमुळे अनेकजण सहकुटुंब पर्यटनासाठी बाहेर पडतात. लोणावळा, खंडाळा परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात. त्यामुळे द्रुतगती मार्गावर वाहतुकीचा ताण वाढतो. मोठ्या संख्येने वाहने द्रुतगती मार्गावर आल्याने वाहतुकीचा वेग कमी होतो. त्यामुळे घाट क्षेत्रात वाहतूक कोंडी होते. घाटात वाहने बंद पडल्याने वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सोसावा लागतो. त्यामुळे वाहतूक नियमन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
वाहतुकीचे नियमन करण्यासाठी दिवसा अवजड वाहने घाट सुरू होण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला थांबविण्यात येणार आहेत. मोटारीसह हलक्या वाहनांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मोटारींच्या संख्येत वाढ झाल्यानंतर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे मार्गिकेवरील ताण कमी करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई मार्गिकेवरील वाहतूक खंडाळा बोगदा परिसरात थांबवून पुणे मार्गिकेवरील वाहतूक विरुद्ध दिशेने वळविण्यात येणार असून, वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे. तापमान वाढीमुळे जड-अवजड वाहने बंद पडत आहेत. त्यांना क्रेन, पुलर, पोलिस क्रेनच्या मदतीने लवकरात लवकर काढून वाहतुकीसाठी मार्गिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.