महाबळेश्वरमधील कृष्णाबाई मंदिर हे भगवान शंकराला समर्पित आहे. मंदिराची निर्मिती ही १८८८ मध्ये झाली. हे मंदिर पूर्णपणे हेमाडपंथी शैलीतील आहे.
जर महाबळेश्वरला जाऊन तुम्हाला तेच ते नेहमीचे पॉईंट्स, नेहमीची मंदिरे आणि तलाव बघायचे नसतील, काहीतरी हटके बघायचं असेल, तर कृष्णामाई विष्णू मंदिर तुमच्यासाठीच आहे. कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांच्या संगमावर वसलेल्या पंचगंगा मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे हेमाडपंथी वास्तुकलेनुसार बांधलेले शिव मंदिर. आता कृष्णाबाई म्हटलं की, आपल्याला नक्की वाटतं की देवीचे मंदिर असेल. मात्र महाबळेश्वरमधील कृष्णाबाई मंदिर हे भगवान शंकराला समर्पित आहे. मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला श्रीकृष्णाची एक मूर्ती बघायला मिळेल. मंदिराची निर्मिती ही १८८८ मध्ये झाली असावी असे सांगितले जाते. मात्र हे मंदिर पूर्णपणे हेमाडपंथी शैलीतील असून त्याचा निर्मिती काळ हा १ हजारांहून अधिक वर्षां पूर्वीचा असावा असे वाटते. मंदिराची बांधकाम शैली, तर इतकी प्राचीन आहे की कदाचित मंदिर पाच हजार वर्षांपूर्वी बनविले गेले असावे असे देखील अनेकांना जाणवते. मंदिराच्या गाभाऱ्यात आणि बाहेर देखील तुम्हाला दगडात कोरलेले छत आणि त्याचसोबत स्तंभ बघायला मिळतात. आपल्याला हे स्तंभ त्या काळातील स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना देऊन जातात.
मंदिराच्या अगदी समोरच तुम्हाला एक गोमुख बघायला मिळेल. गोमुख म्हणजे गाईचं मुख. यातून तुम्हाला समोरच असणाऱ्या कुंडात पाणी पडताना बघायला मिळेल. कुंडातून हेच पाणी पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते. आता मंदिर जरी भगवान शंकराला समर्पित असले, आतमध्ये श्रीकृष्णाची मूर्ती असली तरी मंदिराच्या नावाचा इतिहास जरासा वेगळा आहे. आपण प्रत्येक जण पंचगंगा मंदिरामध्ये जाऊन नक्कीच दर्शन घेताे. पंचगंगा मंदिरामध्ये आपल्याला पाच नद्यांचा एकत्रित संगम झालेला दिसतो. त्या पाच नद्या म्हणजे कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री आणि गायत्री होय. या पाच नद्यांपैकीच एक नदी कृष्णा नदी. गोमुखातून जे पाणी बाहेर पडतं ते ठिकाण म्हणजे कृष्णा नदीचे उगम स्थान. कृष्णा नदी या मंदिरातून उगम पावते म्हणून या मंदिराला कृष्णाबाई मंदिर असं म्हटलं जातं.
कृष्णा नदीचा उगम इथूनच झाला म्हणून याचे नाव कृष्णामाई मंदिर! तसे हे मंदिर कृष्णाबाई अथवा कृष्णाई मंदिर या नावानेदेखील ओळखले जाते. हे मंदिर कधी बांधलं गेलं याबद्दल अनेक मतांतरे आहेत. कोणी म्हणतात १००० वर्षांपूर्वी, तर कोणी ५००० वर्षांपूर्वी. पंचगंगा मंदिरापर्यंत वाहनाने जाऊन पुढे मंदिरापर्यंत चालत जाणे श्रेयस्कर. पण चालताना, असे काही प्राचीन मंदिर इथे असेल, याची पुसटशी जाणीवदेखील होत नाही. मुख्य मंदिर, आवाराच्या मध्यभागी बांधलेले आहे. मंदिराच्या पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे दगडांचे, आवाराचे बांधकाम केलेले आहे. त्याच्या बाजूनेच ओढा वाहतो. त्याला कृष्णा नदीच म्हणतात.
मुख्य मंदिराच्या उत्तरेला एक टेकडीवजा भाग आहे. त्याच्या पुढे दरीच्या बाजूला भग्नावस्थेतील गणेशाचे एक मंदिर देखील आहे. या गणेश मंदिराच्या समोर एक बांधीव कुंड आहे. ते अलीकडच्या काळात बांधले असल्याचे स्थानिक सांगतात. असेच कुंड कृष्णामाई मंदिर आणि त्याच्या दक्षिणेकडे असलेल्या समाधीवजा बांधकामाच्या बाजूला आहे. (हे देखील नंतरच्या काळातील आहे). या सगळ्यांची रचना एकसारखी असून त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. समाधीचे बांधकाम सोळाव्या शतकाच्या सुमारास केलेले असावे. पण ती समाधी कोणाची आहे ही माहिती उपलब्ध नाही. इथे पडणाऱ्या पावसामुळे आणि त्या काळात होणाऱ्या मातीच्या धुपेमुळे काही प्रमाणात मुख्य मंदिराचा काही भाग जमिनीखाली जातो. मुख्य मंदिराच्या समोर असलेल्या कुंडाच्या अलीकडेच एक लहान गोलाकार कुंड आहे. कृष्णेचे लुप्त होऊन येणारे पाणी पहिल्यांदा त्याच कुंडत येते आणि त्याला जोडून असलेल्या गोमुखातून ते मुख्य कुंडात येते. मंदिराला दोन्ही पुढच्या बाजूस ओसऱ्या आहेत. त्यांच्यामध्ये पुढच्या बाजूस असलेल्या पूर्ण खांबांची संख्या दहा आहे, तर त्याच ओळीमध्ये दोन अर्धस्तंभ देखील आहेत. त्याच्यामधल्या प्रत्येक खांबावर एकसारखेच नक्षीकाम केलेले आहे. शिवाय खांबांच्या मागील बाजूस, भिंतीमध्ये देखील तितकेच अर्धस्तंभ आहेत. त्यावर मात्र नक्षीकाम नाही. त्या दोन्ही खांबांना जोडणारी महिरप आहे. याच्या छताच्या भागामध्ये एकूण दहा शिल्पे घडविलेली आहेत.
शिखराच्या रचनेमध्ये महाबळेश्वरमधील काही मंदिरांच्या शिखरांची रचना कृष्णामाईच्या मंदिराच्या शिखरासारखी आहे. अर्थात त्यांचा जीर्णोद्धार झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाबळेश्वराच्या मंदिरात जिजाबाईंची सुवर्णतुला केली आणि मंदिराचा जीर्णोद्धार देखील केला; परंतु त्यांनी त्या मंदिराच्या शिखरामध्ये बदल केला नाही. त्याची बांधणी जुन्याच पद्धतीची ठेवली, जी आज पाहायला मिळते. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ही मंदिरे चौदाव्या-पंधराव्या शतकात बांधली गेली आहेत. कारण महाबळेश्वरमधील मुख्य बहुतांशी मंदिरे ही यादव काळातच बांधलेली आहेत. कालांतराने त्यावर जीर्णोद्धाराचे संस्कार होत आजची मंदिरे पाहावयास मिळतात.
कृष्णामाई मंदिर महाबळेश्वर येथील पंचगंगा उगम व महाबळेश्वर मंदिराला भेट देणाऱ्यांची संख्या भरपूर; पण या दोन देवळांच्या अगोदर बांधलेल्या मूळ कृष्णामाई मंदिराची ओळख करून घेऊ. कार पार्किंगच्या पूर्वेस साधारण ५ ते १० मिनिटांत चालत येथे पोहोचता येते. हे देऊळ फारसे परिचित नाही. अलीकडे आठ-दहा वर्षांत पुरातत्त्व विभागाने उत्खनन करून, साफसफाई करून हे मंदिर उजेडात आणले आहे. हे देऊळ कोणी बांधले याची निश्चित माहिती नाही; पण साधारण ११व्या शतकातील किंवा त्यापूर्वीचे बांधकाम असावे. या मंदिराची शैली परिचित नाही. येथे स्मशानभूमी होती. त्यामुळे याकडे दुर्लक्ष झाले होते. आता येथून स्मशानभूमी हलविली आहे. या मंदिराच्या बाहेरील बाजूला विष्णू, तसेच गरुडध्वज दिसून येतात. वास्तविक विष्णूची प्रतिमा स्मशानाजवळ आढळत नाही. देऊळ वापरात नसल्यामुळे येथे स्मशान झाले असावे. आतील गोमुखातून पाणी पडत असते. समोरील नंदीच्या मूर्तीची शैली खूपच वेगळी आहे. त्याला कोणतेही अलंकार दिसत नाहीत. आतील बाजूस असलेले शिवलिंग एका चौकोनी स्तंभावर आहे. याच्या खालील बाजूस १०८ नाग दिसून येतात. मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील भाग खुला आहे. साधारण १७ ते २३ मार्च व १७ ते २३ सप्टेंबर या कालावधीत येथे संपूर्ण गाभाऱ्यात सूर्यकिरणे पडतात. समोरच कृष्णा खोऱ्याचे दूरपर्यंतचे विहंगम दृश्य दिसते. मंदिराची शिखर बांधणी पावसाचा मारा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. लांबून मंदिराची कल्पनाही येत नाही. कृष्णा नदी येथूनच आपला प्रवास सुरू करते.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माहिती अधिकारी आहेत.)
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…