काँग्रेसच्या विचारसरणीत नाही, तर फक्त राज्यसभेची जागा राखण्यात रस
नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गौरव वल्लभ यांचा काँग्रेसच्या जयराम रमेश यांच्यावर हल्लाबोल
मुंबई : काँग्रेसचे प्रवक्ते असलेल्या गौरव वल्लभ (Gourav Vallabh) यांनी तीन दिवसांपूर्वीच भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला. ‘मी सनातनी विरोधी घोषणा देऊ शकत नाही’, असा जोरदार हल्लाबोल करत त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. यानंतर त्यांनी आज काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश (Jairam Ramesh) यांच्यावर आपले टीकास्त्र उपसले. ‘काँग्रेस पक्षाचा ग्राऊंड लेवल कनेक्ट पूर्णपणे तुटला आहे. ज्या व्यक्तीने शाळेत असताना कधी मॉनिटरची निवडणूक लढवली नसेल तो व्यक्ती काँग्रेस पक्ष चालवतोय’, अशी त्यांनी टीका केली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गौरव वल्लभ यांनी जयराम रमेश यांची कार्यपद्धती कशी चुकीची आहे, याचा पाढाच वाचला.
गौरव वल्लभ म्हणाले, “मी जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा पक्षाचे ४२ खासदार होते. नवीन विचारांना प्रोत्साहन मिळेल या विचाराने मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, मात्र असे काहीही झाले नाही. गेल्या ३० वर्षांपासून काँग्रेसचा जाहीरनामा एकच आहे. एक व्यक्ती तो तयार करत आहे, जर त्या व्यक्तीचे विचार ठाम असते तर आज पक्षाची ही अवस्था झाली नसती.
पुढे ते म्हणाले की, “अर्थसंकल्पानंतर आपल्याला पत्रकार परिषद घेण्यास सांगितले होते. परंतु आपण तसे करण्यास नकार दिला आणि जोपर्यंत काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व अयोध्येतील राम मंदिराला भेट देत नाही, तोपर्यंत पत्रकार परिषद घेणार नसल्याचे सांगितले.”
माजी मंत्र्यांचे पीए पक्षाची धुरा सांभाळत आहेत
माजी केंद्रीय मंत्र्यांचे पीए आता काँग्रेस पक्ष सांभाळत असल्याची टीका गौरव वल्लभ यांनी केली. ते म्हणाले की, त्या पीएला निवडणूक कशी लढवायची हे माहित नाही. उत्तर प्रदेश आणि बिहार ही वेगवेगळी राज्ये आहेत हे त्यांना कदाचित माहीत नसेल. असे काही त्यांना विचारले तर ते गोंधळून जातील. जर तुम्ही त्यांना जालोरे, सरोही कुठे आहेत असे विचारले तर ते कदाचित मध्य प्रदेश म्हणतील. हे त्यांचे ज्ञान आहे. अशा नेत्यांचे ग्राउंड कनेक्शन खूपच कमकुवत आहे.
त्या व्यक्तीला आपली राज्यसभेची जागा वाचवण्यात रस
गौरव वल्लभ हे जयराम रमेश यांच्यावर टीका करताना म्हणाले की, “मी कॉलेजमध्ये असताना ती व्यक्ती काही वर्षांपूर्वी काँग्रेसची प्रवक्ता होती. आता ती संपर्क कक्षाची प्रमुख आहे. त्यांना काँग्रेसच्या विचारसरणीत रस नाही. त्यांना फक्त त्यांची राज्यसभेची जागा राखण्यात रस आहे.”