Saturday, July 13, 2024
Homeसाप्ताहिककोलाजRadio era : गाता रहे मेरा दिल

Radio era : गाता रहे मेरा दिल

  • हलकं-फुलकं : राजश्री वटे

घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, या भूपाळीच्या भक्तीपूर्ण आवाजाने जाग यायची व प्रसन्न पहाट उजाडायची.

टी. व्ही. चा डब्बा अस्तित्वात येण्याच्या आधीचा काळ खरंच कानांना मधुर संगीताची पर्वणी देणारा तो छोटासा गाणारा डब्बा प्रत्येकाच्या मनावर अर्थात कानावर राज्य करीत होता!! आलं ना लक्षात हे सगळं रेडिओबद्दल आहे, ज्याने मनुष्य जीवन व्यापून टाकले होते! लहान मुलांसाठी रविवारी सकाळी १० वाजता एक तास ‘बाल विहार’ हा कार्यक्रमात अरविंद मामा व कुंदाताई गोष्टी सादर करीत. बडबड गिते, नाटुकली पण असायची. एक तासाच्या या कार्यक्रमाचे किती अप्रूप बालकांना! महिलांसाठी ११ वाजता ‘आपली आवड व वनिता विश्व’ हे गृहिणीसाठी लागतं असे, यात वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्र, वैद्यकीय सल्ला, पदार्थाच्या कृती सांगितल्या जात, अधून मधून छानसं मराठी गाणं, नाट्यसंगीत यांची मेजवानी असे. एक दीड तासांच्या या कार्यक्रमामुळे कामाने थकलेली गृहिणी पुन्हा उल्हासित व्हायची. तेवढंच तिचं विश्व स्वतःसाठी फुलायचं. कधी दुपारी ४ वाजता घरातल्या आजी- आजोबांसाठी भजन, कीर्तन, भक्तीगीत सुद्धा सादर होत या छोट्याशा डब्यात!!

संध्याकाळनंतर याचं तरुणाईवर राज्य. रात्री ८ वाजल्यापासून एक तास वेगवेगळ्या प्रसंगावर आधारीत गाणे, कधी नटी किंवा नट यांचेच खास गाणे लागायचे, आवडता हिरो, हिरोईनचे गाणे लागले की मन हुरळून जायचे, स्वप्नाच्या जगात विहरत राहायचे. दर बुधवारी रात्री ८ वाजता अमीन सयानीचा आवाज ऐकण्यासाठी कान आतुर असायचे. पहली बादान पर कौन सा गाना रहेगा इस बुधवार यांच्या चर्चा कट्ट्यावर रंगायच्या!!

रात्री १० वाजता रोज छायागीत शुभ्र धवल चित्रपटातील नटखट हिरोईनच्या रोमँटिक गाण्याचा सिलसीला चंद्र चांदण्यांना, कधी गुलाबी थंडीला, कधी बरसणाऱ्या सरीच्या साक्षीने बहरत जायचा. अशी जादू असायची त्या छायागीतच्या गाण्यामध्ये!!

जाने वो कैसे लोग थे जिनके
चैन से हमको कभी आप ने जिने ना दिया…
अशी अनेक गाणी मनात झिरपत जायची व डोळा लागायचा व मन झोपेच्या अधीन व्हायचे! उन्हाळ्यांत चांदण्या पांघरून झोपल्यावर रस्त्यावरून एखादा सायकलस्वार निघून जायचा, खांद्यावर ट्रांझिस्टर लटकलेला. काय शान असायची त्याची अशा स्टाईलमध्ये वा.. वा… खरे आंबट शौकिन!!

सगळ्या साईझचे रेडिओ कानांना घट्ट पकडून कोणाची बॅटिंग, कोण आउट होणार याचा फड रंगायचा, कॉलेजमध्ये लेक्चर्स बंक करून कोणीतरी पॉकेट रेडिओ आणलेला असायचा, त्यावर मॅच ऐकण्याची मजा पुन्हा येणे नाही. गाणे गुणगुणायची सवय यानेच लावली. आवडतं गाणं मनात उतरत जातं, हृदयावर राज्य करतं. आजच्या मोबाईल, टीव्हीच्या राज्यात तो हळूहळू निघून गेला. अभि ना जाओ छोडकर म्हणेपर्यंत दिसेनासा झाला, तरी मन गातच राहील.‘कभी अलविदा ना कहना’ मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवायचं ज्याने जीवनाचे गाणे केले!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -