मायभाषा: डॉ. वीणा सानेकर
कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर मायभाषेसमोर २००१ नंतर उभा केला गेलेला माहिती तंत्रज्ञान याविषयाचा पर्याय, या कारणाने मराठीसमोर उभी राहिलेली आव्हाने यावरील गेल्या आठवड्यातील लेखाला उत्तम प्रतिसाद मिळाला. मराठी विषयाचे प्राध्यापक, अभ्यासक, विद्यार्थी, मराठीप्रेमी इत्यादींच्या सहभागातून आझाद मैदानात उभ्या राहिलेल्या आंदोलनाच्या आठवणी ताज्या झाल्या. यादरम्यान विद्यार्थीही पथनाट्याच्या माध्यमातून या आंदोलनानिमित्ताने जागृतीपर आवाहन कार्यात सहभागी झाले होते. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. गेल्या २२ वर्षांत जी हानी झाली ती भरून काढता येणे कठीण आहे.
आज अनेक पालक आय. टी. हाच विषय आपल्या पाल्याला हवा म्हणून वाद घालतात. आमच्या मुलाला ‘भाषा’ हा विषय घ्यायचा नाही असे निक्षून सांगतात, तेव्हा वाईट वाटते. मराठी भाषिक मुलंही ‘मला आय. टी. हवे नि मराठी नको’ असे इंग्रजीत सांगतात. मोबाइलच्या रूपात जग बोटावर आल्याने आपसुकच माहिती तंत्रज्ञानाशी विद्यार्थ्यांची मैत्री झाली. मुलांची भाषेशी मैत्री करून देणे मात्र राहूनच गेले नि याची ना खंत ना खेद. नुकतीच एक बातमी वाचनात आली, भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने प्रश्नपत्रिका स्थानिक भाषेत उपलब्ध करून देण्याचा आदेश तंत्रशिक्षण संस्थांना दिला आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नाचे स्वरूप समजून घेण्यात अडचण येऊ नये हा हेतू आहे.
स्थानिक भाषांचे जतन व संवर्धन ही आपली गरज आहे. याविषयीची जाणीव होत असतानाच इंग्रजी शब्दांना स्थानिक भाषेत पर्याय उपलब्ध होणे व ज्ञानक्षेत्रांशी निगडित शब्दसंग्रह लहानपणापासूनच मुलांना परिचित होणे आवश्यक आहे. या दृष्टीनेच आपल्या मातृभाषा या ज्ञानभाषा म्हणून सक्षम होणे अपरिहार्य आहे. त्यासाठी विविध दिशांनी आपल्या भाषांची प्रगती करणे हे निजभाषकांचे कर्तव्य ठरते. लहानपणापासून मराठीतील पुस्तके मुलांच्या हाती देणे, एखाद्या मराठी ग्रंथालयाशी त्यांना जोडून देणे, घरात मराठी मासिके, नियतकालिके यावीत म्हणून त्यांचे वर्गणीदार होणे ही पालकांची जबाबदारी ठरते. नुकतीच नागपूरमधील २७ ग्रंथालये २०२२ -२३ या वर्षांत बंद पडल्याचे वृत्त वाचनात आले.
मुख्य म्हणजे ही सर्व ग्रंथालये अनुदानित होती. ग्रंथालयांमध्ये पुरेशा सोयी नसणे, पुस्तकांची दुरवस्था, साफसफाईच्या अभावातून साचत गेलेली धूळ या सर्वात ही ग्रंथालये वाचक गमावून बसली, तर आश्चर्य कसले? अस्तित्वात असलेली ग्रंथालये बंद होणे हे वाचनसंस्कृतीचे केवढे मोठे नुकसान आहे. अस्तित्वात असलेल्या ग्रंथालयांचे सक्षमीकरण आधी व्हायला हवे. मग पुस्तकांची गावे वसवण्यात अर्थ आहे.