मातृदेवो भव...


  • मनस्विनी : पूर्णिमा शिंदे


आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर मिळून शब्द होतो ‘आई’. प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधूआई. आईच्या हातचा प्रेम मार खाण्यासाठी साक्षात देव सुद्धा या पृथ्वीवर पुन्हा पुन्हा अवतार घेतात; “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”. निसर्गाने मातृत्वाचे वरदान स्त्रीला दिले ते महनीय, वंदनीय आहे.



आपले राजे छ. शिवराय सुद्धा राजमाता जिजाऊंना वंदन केल्याशिवाय दिवसभराच्या कामाला प्रारंभ करत नसत. नेपोलियन बोनापार्ट याची कीर्ती सबंध जगभर पसरली. ते सुद्धा आई पुढे नमत असत. साने गुरुजींनी मातेच्या आज्ञापालनासाठी संस्कारांची दीपस्तंभ घराघरांमध्ये अक्षर लेण्यांनी साऱ्यांच्या मनावर कोरले. ममत्व, देवत्व, संतत्व यांचा संगम म्हणजे आई, करुणा, स्नेह, त्याग, मायाममता, जिव्हाळा यांचा मिलाप म्हणजे आई. स्वामी विवेकानंदांनी आईची महती सांगताना सांगितले की, नऊ महिने एक किलो वजनाचा दगड पोटावर बांधून सर्व दिनचर्या, कार्य करा मग समजेल तुम्हाला आई काय असते! आई म्हणजे प्रसूती वेदनांतही पुनर्जन्मातही मूल जन्माला घालणाऱ्या हसत हसत मरण पत्करणारी ती देवता असते. बाळाचे संगोपन, पालन, पोषण संस्कार देणारी ती देवी.



आई माझा गुरू, आई
माझा कल्पतरू,
सौख्याचा सागरू,
आई माझी,


प्रीतीचे माहेर,
मांगल्याचे सार,
वात्सल्यरूपी मन
आई माझी.


सगळ्या लेकरांनी मात्र एक करा की जिथे आई आहे तिच्या डोळ्यांत अश्रू येतील अशी कोणतीही गोष्ट करू नका. तिच्या मनाला समाधान लाभेल, तिच्या समोर एकच करा. स्वर्गात एका बाळाने देवाला विचारलं, मला तू पृथ्वीवर पाठवतोयस पण तिथे माझी काळजी घेणारं कोण असणार? कोण घेणार माझी काळजी? यावर देव म्हणाला, “तिथे एक परी असणार तिचं नाव आहे आई! ती तुला काही सुद्धा कमी पडू देणार नाही. माहेर नावाच्या बँकेतून कोरे चेक देणारं, कधीच न आटणारं मायेचं खातं! आनंदाचं दान भरभरून कधीच रिती नसून देणारी ओंजळ, वात्सल्याचा विशाल सागर, पुनवेचं टिपूर मनप्रसन्न चांदणं, पहाटेची गार झुळूक, श्रावणाची सर, आनंदाचा झरा आणि चैतन्याचा वारा, करुणेची ऊब, आईच्या मायेचा झरा कधीच आटत नाही.


पहिली गुरू, पहिले दैवत असते,पहिले प्रेम आईचं. प्रेम हेच वैभव, श्रीमंती असते. प्रत्येक बाळाला वाटतं “आईच्या कुशीत जगलो निवांत कधी ना वाटली कशाचीच खंत ”. राणी पुतळाबाई जिवंत समाधी घेतात तेव्हा धर्मवीर स्वराज्य रक्षक छ. संभाजी महाराज व्याकुळ होऊन म्हणतात, मातोश्री उठाना. आई नुसती घरात बसून जरी असली ना तरी ३३ कोटी देवांची जत्रा भरते. आईशिवाय घर नसतच! हे शब्द काळीज चिरून जातात. कवी यशवंत लिहितात, प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. तर फ. मुं. शिंदे लिहितात, आई असते एक धागा, वातीला उजेड दाखवणारी, समईतील जागा, घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान, भिजून गेली अंधारात ही सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान, आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही, उरतही नाही. लेकराची माय, वासराची गाय, लंगड्याचा पाय, दुधावरची साय आणि धरणीची ठाय. आईसारखे दुसरे दैवत साऱ्या जगतात नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आई हे असं दैवत असतं की मनातलं ओळखणारी, डोळ्यातलं जाणणारी सुख-दुःखामध्ये सर्व काळ प्रेमाचा वर्षाव करणारी आई असते. बोरुची केली लेखणी, समुद्राची केली शाई, आभाळाचा केला कागद तरी आई तुझी महती लिहिता येणार नाही. आपल्या कातड्याच्या पायतान करून तिच्या
पायी घातल्या तरी सुद्धा तिचे उपकार फिटणार नाही.



“आई थोर तुझे उपकार” म्हणूनच म्हटले आहे कारण तिचे कष्ट, तिच्या यातना, तिने लेकरांसाठी केलेली प्रत्येक गोष्ट ही मायेनं. त्यात तिचा त्याग, ओढ, जिव्हाळा, माया, करुणा समर्पण आणि खडतर परिश्रमाची जोड त्यासह असतं संस्काराचं खत, सुविचाराचे कोंदन, सहन शक्तीचं वरदान म्हणून म्हणावसं वाटतं की, “ घे जन्म फिरूनी येईन मी ही पोटी..खोटी ठरो न देवा ही एक आस मोठी ” असंच म्हणूया तर देवा सुखी ठेव तिला, जिने मला जन्म दिला. आज माझ्या प्रेमळ आईचा जन्मदिन तिच्यासाठी आणि प्रत्येक आईसाठी या स्नेहल शुभेच्छा! जोवर चंद्र सूर्य या धरतीवर. किती किती लिहू आईच्या महतीवर!

Comments
Add Comment

क्रिकेटमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर आज क्रिकेट सामन्याप्रसंगी तसेच नंतर ॲक्शन रिप्ले आणि हायलाईट्सच्या माध्यमातून

साहित्यातला दीपस्तंभ - वि. स. खांडेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय

ए मेरे दिल कहीं और चल...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे प्रत्येकाच्या जीवनात असा एखादा क्षण येऊन गेलेलाच असतो की जेव्हा त्यावेळी

वंदे मातरम्’ मातृभूमीचे सन्मान स्तोत्र

विशेष : लता गुठे भारतीय संस्कृतीचा विचार जेव्हा मनात येतो, तेव्हा अनेक गोष्टी मनात फेर धरू लागतात. अतिशय प्राचीन

पारिजातक वृक्ष पृथ्वीवर येण्याची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पारिजातकाला स्वर्गातील वृक्ष असेही म्हटले जाते. पारिजात हा एक सुगंधी

घर जावई

क्राइम : अॅड. रिया करंजकर लग्न या संस्काररूपी संस्थेवरून तरुणांचा विश्वास उडत चाललेला आहे. शादी का लड्डू नही खावे