
अर्जुन मोढवाडिया यांचा काँग्रेसवर खोचक टोला
गांधीनगर : गुजरातमधील काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदावर राहिलेल्या अर्जुन मोढवाडिया यांनी नुकतेच भाजपात प्रवेश केला. पोरबंदरमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ते भाजपाकडून उभे राहिले आहेत. अर्जुन मोढवाडिया गुजरातमधील काँग्रेसचे जुने जाणते मातब्बर राजकारणी मानले जात होते. मात्र, काँग्रेसमध्ये इतक्या महत्त्वाच्या पदावर असूनही त्यांनी पक्ष का सोडला तसेच त्यांना पक्षात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला याविषयी त्यांनी एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधला.
'एखादा राजकीय पक्ष चालवणं हे काही अर्धवेळ नोकरीसारखं काम नाही'. केवळ सभेला उपस्थित राहून मोदींवर टीका करणं एवढंच तुमचं काम असू शकत नाही, तुम्हाला लोकांना आकर्षित करावं लागेल आणि त्यांच्यासोबत स्वत:ला जोडून घ्यावं लागेल. लोकांच्या भावना काय आहेत त्या समजून घ्याव्या लागतील, अशी टीका अर्जुन मोढवाडिया यांनी काँग्रेसवर केली आहे.
२०२२ च्या निवडणुकीच्या साधारण एक वर्षे आधी अर्जुन मोढवाडिया यांनी आपण गुजरातमध्ये अस्तित्वाचीच लढाई लढत आहोत असा काँग्रेसच्या नेतृत्वाला इशारा दिला होता. मात्र सध्या काँग्रेस कुठेच अस्तित्वात नाही अशी धारणा निर्माण झाली आहे, त्यावर लवकर बदल करणं गरजेचं आहे, असे अर्जुन मोढवाडिया यांनी सांगितले.
भाजपाकडून तिकीट मिळेल याची अपेक्षा होतीच
भाजपा आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारची कामं देते. त्यामुळे ते मला काहीतरी काम नेमून देतील अशी मला अपेक्षा होतीच. मला असं वाटलं की, राज्यातील काँग्रेसची ही परिस्थिती काही मी बदलू शकणार नाही. अशा पार्श्वभूमीवर इतकी वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ राहून आणि त्यांच्याविरोधात लढूनही जेव्हा नरेंद्रभाई आणि अमितभाईंसारखा नेता तुम्हाला मनापासून त्यांच्या पक्षात बोलावतो, तेव्हा सहाजिकच अशा गुदमरवून टाकणाऱ्या वातावरणात काम करण्यापेक्षा तिथेच जाणं कुणीही पसंत करेल, असे अर्जुन मोढवाडिया यांनी म्हटले.