
नुकतीच राष्ट्रवादीची उमेदवारी मिळालेल्या अर्चना पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य
मुंबई : महायुतीमध्ये (Mahayuti) धाराशिव (Dharashiv) हा मतदारसंघ अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सुटला आणि या ठिकाणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. तीन दिवसांपूर्वीच ७ एप्रिलला अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्याचवेळी त्यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.
अर्चना पाटील प्रचारासाठी बार्शीत आल्या होत्या. यावेळी बार्शीत आमदार राजेंद्र राऊत यांचं वर्चस्व आहे, त्यामुळे आपण बार्शीत राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढवणार का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारला. यावर 'माझा नवरा भाजपचा (BJP) आमदार आहे. मी कशाला राष्ट्रवादी वाढवू?, असं वक्तव्य त्यांनी केलं. अर्चना पाटील यांनी ज्या पक्षातून उमेदवारी घेतली आहे तोच पक्ष कशाला वाढवू असं वक्तव्य केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता
अर्चना पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करत उमेदवारी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे अर्चना पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे.