Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीअरुण गवळी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात कोणाला साथ देणार?

अरुण गवळी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात कोणाला साथ देणार?

लवकरच तुरुंगातून मुक्त होवून राजकीय सक्रियतेची चर्चा

मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीची मुक्तता करण्यासाठी न्यायालयाने तुरूंग प्रशासनाला आपली भूमिका मांडायला सांगितली आहे. गवळी याच्या सुटकेचा आताच योग कसा काय जुळून आला, गवळी सुटला तर तो पुन्हा राजकारणात सक्रिय होणार का? झालास तर त्याचा फायदा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात कोणाला होईल, यावरून तर्कवितर्क मांडले जात आहेत.

गुंडगिरीकडून १९९७ मध्ये राजकारणाकडे वळणाऱ्या अरुण गवळी याने अखिल भारतीय सेना या पक्षाची स्थापना केली. २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तत्कालिन चिंचपोकळी ( आत्ताचे भायखळा) मतदारसंघातून गवळी निवडून आला. त्यानंतर भायखळामध्ये गवळीने स्वतःचे वर्चस्व निर्माण केले, आमदार असताना गवळी याने पक्ष विस्ताराच्या कामाला त्याने गती दिली. मुंबईत भायखळा, नागपाडा, आग्रीपाडा विशेषता भायखळा विधानसभा मतदारसंघात त्याने आपले वर्चस्व निर्माण केले. या वर्चस्वामुळे गवळी याचा राईट हॅन्ड समजला जाणारा सुनील घाटे, मुलगी गीता गवळी व वहिनी वंदना गवळी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. मात्र गवळी याला फार काळ आपले वर्चस्व टिकवता आले नाही.

२००९ पासून गवळी यांचा भायखळा विधानसभेतील करिष्मा कमी होत गेला. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अरुण गवळी याचा पराभव झाला. २०१४व २०१९ मध्ये या मतदारसंघातून गवळी याची मुलगी गीता हिने निवडणूक लढवली. पण मतदार राजाने तिला नाकारले. २०१९ मध्ये गीता गवळी हिला अवघी १० हजार ४०० मते मिळाली होती. २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीतही गवळीला आपले वर्चस्व टिकवता आले नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत गीता गवळी ही एकमेव नगरसेविका निवडून आली.

मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेच्यावेळी गवळी यांनी शिवसेनेला साथ दिल्यामुळे मुलगी गीता गवळीला आरोग्य समितीच्या अध्यक्ष पदी सलग तीनवेळा बसवले. स्थायी समितीचे सदस्य पदही दिले. मात्र मुंबई महापालिका विसर्जित होण्याच्या शेवटच्या टप्प्यात गवळी कुटुंबाने भाजपाची साथ दिली. शिवसेनेकडून आणण्यात येणाऱ्या अनेक प्रस्तावांच्या विरोधात गीता गवळी यांनी उघडपणे मतदान केले. त्यामुळे गवळी सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये व जेलमधून बाहेर येण्यासाठी महायुतीला साथ देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण गवळी हा सुरुवातीपासून शिवसेना विशेषतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रेमी असल्यामुळे त्याचा कितपत फायदा होईल, याची चाचपणी महायुतीकडून करण्यात येत आहे. न्यायालयाने तुरूंग प्रशासनाला आपली भूमिका मांडायला सांगितली आहे. गवळीबाबतच्या निर्णयाचा लाभ-नुकसान ही पार्श्वभूमी व जमाबेरीज यावरच राज्य सरकारची भूमिका ठरण्याची शक्यता आहे.

गवळीच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढत असताना त्याचा भाचा सचिन अहिरने मात्र त्याच्या विरोधातील राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करून निवडणुका लढल्या आहेत. अहिर बरेच वर्षे राष्ट्रवादीत होते. आता ते शिवसेना (ठाकरे) गटात आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -