काँग्रेस हे बुडते जहाज आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी काँग्रेस नेत्यांची स्पर्धा लागली आहे. काँग्रेसबद्दल सहानुभूती वाटण्याची काहीच गरज नाही. कारण काँग्रेसने आजपर्यंत मुस्लिमांचे लांगूलचालन करण्याचे जे सर्व पातळी सोडून तंत्र अवलंबिले होते आणि अल्पसंख्याकांना खूश करण्यासाठी काँग्रेसने सारी मर्यादा ओलांडली होती. काँग्रेसमध्ये काही हिंदू नेते राहिले होते, त्यांची प्रचंड घुसमट होत होती. ती घुसमट व्यक्त करत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेसतर्फे टीव्हीवरील राष्ट्रीय चर्चांच्या दरम्यान पक्षाची बाजू मांडत असत. पण आता त्यांनी राजीनामा देताना आपण सनातनविरोधी घोषणा देऊ शकत नाही, असे सांगत काँग्रेसचे नेते राहुल आणि सोनिया गांधी यांना शालजोड्यातील हाणली आहे.
काँग्रेसची सत्ता होती तेव्हा अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करताना पक्षाने सारी सीमा सोडली होती. मौनी बाबा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तर या देशात जे काही आर्थिक स्त्रोत आहेत, त्यावर पहिला हक्क मुसलमानांचा आहे, असे सांगत अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. कोणत्याही अॅक्शनला रिअक्शन असतेच, या न्यूटनच्या नियमाप्रमाणे हिंदूंकडे सातत्याने दुर्लक्ष करण्याच्या आणि मुस्लिमांना खूश करण्यासाठी कमाल पातळी गाठणाऱ्या काँग्रेसविरोधात मग हिंदूंचा संताप व्यक्त व्हावा आणि त्यात काँग्रेस सत्तेतून बाहेर व्हावी, हा तर नियतीने उगवलेला सूड होता. कारण काँग्रेसच्या या अतिरेकी मुस्लीम लागूंलचालनामुळेच भाजपाला देशात इतका मोठा अवकाश मिळाला आणि त्यात पंतप्रधान मोदी यांचे कणखर नेतृत्व समोर आल्यावर लोकांना एक चांगला पर्याय भाजपाच्या रूपात सापडला.
भारताची मूळ प्रवृत्ती सनातन धर्माची आहे आणि या सनातन धर्माचा झेंडा हाती घेतलेल्या मोदींना देशात प्रचंड पाठिंबा मिळतो आहे, यात काहीच आश्चर्य नाही. राहुल आणि सोनिया गांधी हे आजकाल कुणी पक्ष सोडून जात असेल तर त्याला थांबवण्याच्या मानसिक स्थितीत नाहीत. त्यांना आता कोणताही धक्का बसायचे उरलेले नाही. युवा नेते गेले तर उलट सोनियांना आपल्या पुत्राच्या मार्गातील एक काटा दूर झाल्याचे समाधान वाटते, असे दिसते. कारण ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारखे युवा नेते गेल्यावर सोनियांनी त्यांचे मन वळवण्याचा काहीही प्रयत्न केला नाही. काँग्रेसवर पक्की मांड ठोकण्याचा सोनिया आणि राहुल यांचा इरादा असला तरीही यात आपला पक्ष दखल घेण्याजोगाही उरणार नाही, याची त्यांना कल्पना नाही. एकेकाळी ग्रँड ओल्ड पार्टी म्हणून ओळखला जाणारा काँग्रेस पक्ष आता केवळ लहानशा प्रादेशिक पक्षाच्या स्वरूपात उरला आहे आणि अशीच गळती सुरू राहिली तर हे प्रादेशिक पक्ष म्हणून त्याचे अस्तित्व राहील की नाही, याचीही शंका आहे.
सनातन धर्माची पताका खांद्यावर घेतलेल्या मोदी यांना काँग्रेसमधून नाही तर इतर पक्षांतून आणि देशातूनच प्रचंड असा पाठिंबा मिळत आहे आणि म्हणून सत्ता नाही म्हणून नेते पक्ष सोडत आहेत, असा युक्तिवाद काँग्रेसचे नेते करत असतील तर ती त्या पक्षाची सर्वात मोठी आत्मवंचना ठरेल. काँग्रेस नेत्यांना आता बदलत्या वाऱ्याची जाणीव उरलेली नाही, इतकाच याचा अर्थ आहे. गौरव वल्लभ हे तर लहान उदाहरण आहे. मुख्यमंत्री राहिलेल्या कित्येक नेत्यांनी या काळात काँग्रेस सोडून भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. त्या सर्वांनीच सुरक्षित भविष्यासाठी असे केले असेल, असे म्हणण्याचा काँग्रेसचा युक्तिवाद असेल तर तो पक्ष मूर्खांच्या नंदनवनात राहत आहे, असेच म्हणावे लागेल. कारण काँग्रेसमध्ये आज कुणालाच सुरक्षित वाटण्याचे तर राहू द्या, पण आपले काय होईल, याची चिंता भेडसावत आहे.
भाजपाच्या भगव्या लाटेत आपली लहानशी नौका कुठे आपटून फुटेल, याचे भानही काँग्रेसच्या नेत्यांना नाही. गौरव वल्लभ यांनी तर काँग्रेस नेत्या विशेष म्हणजे मातापुत्रांच्या जोडीला सुनावले आहे. वल्लभ यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून पक्षाची डळमळती स्थिती समोर आणली आहे. या स्थितीत आपण पक्षात राहू शकत नाही, असे सांगत त्यांनी खरगे यांना वस्तुस्थिती सांगितली आहे. काँग्रेस पक्ष हा कायम अहंकारी आहे आणि त्याचा अहंकार अजूनही मिटलेला नाही. त्यामुळे पक्षाचे नेतृत्व आपल्याच अहंकारात मग्न आहे आणि यामुळे कित्येक नेते सोडून जात असल्याची जाणीवही या नेतृत्वाला आहे की नाही, याची शंका येते. मुंबईत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी काँग्रेस सोडली तर बिहारमधील एका काँग्रेस नेत्यानेही राजीनामा दिला. काँग्रेस बुडते जहाज असल्याची प्रत्येकाला खात्री पटली आहे. केवळ तसे राहुल आणि सोनिया यांना वाटत नाही.
काँग्रेसमध्ये अजूनही गटबाजी, नेत्यांनी एकमेकांविरोधात सोनिया आणि राहुल यांच्याकडे जाऊन कागाळ्या करणे हे प्रकार थांबलेले नाहीत. मागे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना प्रभा राव या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष होत्या आणि केवळ विलासरावांना चांगले काम करू द्यायचे नाही, या अटीवर पद दिले होते. मार्गारेट अल्वा या दुसऱ्या नेत्या विलासरावांच्या मार्गात काटे पसरण्यास नेमलेल्या होत्या. आता तो सारा इतिहास झाला पण काँग्रेसमध्ये अजूनही हे सारे प्रकार सुरू आहेत. राज्ये हातची गेली, पक्षाच्या जागा गेल्या आणि महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष सामील आहे त्या आघाडीत छोटे पक्षही काँग्रेसला डोळे दाखवायला लागले आहेत. तरीही काँग्रेस नेत्यांना आपण आता तरी एकजूट दाखवली पाहिजे, याचे भान येत नाही. नियतीने काँग्रेसवर उगवलेला सूड आहे आणि तो काँग्रेस पक्ष पूर्ण रसातळाला जाईपर्यंत शमणार नाही, असे दिसते.