
सांगलीच्या जागेवरुन मविआत नेमकं चाललंय काय?
सांगली : सांगलीच्या (Sangli) जागेवरून महाविकास आघाडीत (MVA) सध्या चांगलीच बिघाडी झाली आहे. या जागेवरुन चर्चा सुरु असताना ठाकरे गटाने (Thackeray Group) मात्र एका जाहीर सभेत थेट चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेस (Congress) नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाकरे गट आघाडीचा धर्म पाळत नाही, अशी टीकाही करण्यात आली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने देखील काँग्रेसच्या या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यामुळे सांगलीच्या जागेवरुन ठाकरे गट चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीमागे नेमकं काय कारण असावं याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सांगलीच्या जागेवर तडजोड करण्यास ठाकरे गट तयार नाही, तर ही जागा सोडण्यास काँग्रेसही तयार नाही. सांगलीच्या जागेचा मुद्दा काँग्रेसने दिल्लीच्या नेत्यांकडे मांडला आहे. ही जागा काँग्रेसला न मिळाल्यास आम्ही चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे. यातच संजय राऊत भाजपा नेत्याच्या भेटीला गेल्याने मविआमध्ये नेमकं काय चाललंय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजपाने सांगली येथून संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त करत विरोध केला आहे. याच विलासराव जगताप यांची जत येथे जाऊन संजय राऊतांनी भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे.
काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या भूमिकेमुळे ठाकरे गटाची चांगलीच पंचाईत झाली आहे. असे असतानाच संजय राऊत यांनी भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांची भेट घेतली. या भेटीचा नेमक उद्देश काय होता? सांगली जिल्ह्याचा तिढा सोडवण्यासाठी ही भेट झाली का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.