Thursday, October 30, 2025
Happy Diwali

‘दिल दोस्ती दुनियादारी’मुळे ओळख मिळाली

‘दिल दोस्ती दुनियादारी’मुळे ओळख मिळाली
  • टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल

अभिनयाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेला अभिनेता अशी ओळख ज्याने निर्माण केली तो अभिनेता आहे पुष्कराज चिरपुटकर. पिंपरी- चिंचवडमधील आकुर्डीतील रुरसेला या कॉन्व्हेन्ट शाळेत त्याचे शिक्षण झाले. शाळेतील स्नेहसंमेलनात त्याने भाग घेतला होता. काही नाट्य शिबिरामध्ये त्याने भाग घेतला. पुढे त्याने इंजिनीअरिंग कॉलेजला प्रवेश घेतला. तिथे त्याने काही स्पर्धेसाठी नाटकात कामे केली. इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात असताना त्याने अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्याचे ठरविले. कॉलेज पूर्ण झाल्यावर काही प्रायोगिक नाटकात त्याने कामे केली. पाच वर्षांनंतर त्याला पहिली मालिका मिळाली. त्या मालिकेचं नाव होत ‘दिल दोस्ती दुनियादारी.’

ही मालिका त्याच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरली. त्या मालिकेतील त्याने साकारलेलं आशुतोष पात्र गाजलं. तो सतत काहीना काही खात असतो, त्याचा भाबडेपणा प्रेक्षकांना खूप आवडला. मालिका पाहिल्यानंतर काहीजण त्याला म्हणाले की, त्याचा मित्र त्याच्यासारखाच आहे. त्याला आता सगळेजण ‘आशू’ म्हणतात. त्यानंतर ‘बाप जन्म’ हा चित्रपट त्याने केला. ‘माझ्या बायकोचा नवरा’ हे नाटक सध्या सुरू आहे. या नाटकामध्ये संजय नावाची व्यक्तिरेखा त्याने साकारली आहे. तो एका कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉल असतो. तो मनाने भाबडा असतो. त्याचं अनामिका नावाच्या मुलीशी लग्न झालेलं असतं; परंतु नंतर अचानक त्याचा जीवनात वादळ येतं. अनामिकाचा पहिला पती येतो, तो कसा येतो? का येतो? त्याच्यात काय गमती जमती होतात हे सारे या नाटकात पहायला मिळेल.

‘मुसाफिरा’ या चित्रपटामध्ये त्याची अमेय नावाची व्यक्तिरेखा आहे. या चित्रपटामध्ये पाच मित्रांची घटना आहे. त्या पाच मित्रांपैकी तो एक असतो. तो विनोद करतो, मित्रांना हसवतो; परंतु त्याच्या मनामध्ये काय आहे हे इतरांना कळत नाही. या चित्रपटाचे शूटिंग स्कॉटलंड येथे झाले. ‘मुंबई डायरी’ या वेब सिरीजमध्ये त्याने काम केले. ‘चंदू चॅम्पियन’ नावाचा हिंदी चित्रपट येणार आहे. त्यामध्ये देखील तो आहे. आगामी एका वेब सिरीजमध्ये तो नकारात्मक भूमिकेत आहे. विविधांगी भूमिका साकारण्याची इच्छा मनी बाळगणाऱ्या पुष्कराजला भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Comments
Add Comment