Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रराजकीयमहत्वाची बातमी

Nitesh Rane : संजय राऊतचा सांगली दौरा प्रचारासाठी नव्हे तर १०० कोटींच्या वसुलीसाठी!

Nitesh Rane : संजय राऊतचा सांगली दौरा प्रचारासाठी नव्हे तर १०० कोटींच्या वसुलीसाठी!

काय आहे वसुली प्रकरण? भाजपा आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज सांगलीच्या (Sangli) दौर्‍यावर आहेत. महाविकास आघाडीमध्ये (MVA) सांगलीच्या जागेवरुन आधीच धुसफूस सुरु आहे. शरद पवार गट (Sharad Pawar Group) व काँग्रेसचं (Congress) मत विचारात न घेता ठाकरे गटाने चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना सागंलीतून उमेदवारी दिली. त्यांच्याच प्रचारासाठी आणि गाठीभेटी घेण्यासाठी संजय राऊत आज सांगलीमध्ये गेले आहेत, असं चित्र ठाकरे गटाकडून (Thackeray Group) भासवण्यात येत आहे. मात्र, याबाबत भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत सांगलीमध्ये नेमकं कशासाठी गेले आहेत, यासंबंधी नितेश राणे यांनी मोठा खुलासा केला आहे.


नितेश राणे म्हणाले, पुण्यातील एका काँग्रेसच्या नेत्याचा मला आज सकाळी फोन आला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, सांगलीच्या लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आम्ही मागे घेतो पण आम्हाला १०० कोटी द्या, असा प्रस्ताव मातोश्रीवरुन ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाचा दबाव टाकण्यासाठी, काँग्रेसला झुकवण्यासाठी आज संजय राऊतचा दौरा सांगलीमध्ये चालू आहे, असा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला.


सांगलीच्या उबाठा कार्यकर्त्यांना वाटत असेल की संजय राऊत आमच्यासाठी आले आहेत, चंद्रहार पाटलांना वाटत असेल की भांडुपचा देवानंद माझ्यासाठी सांगलीमध्ये आला आहे, पण खरं तर जो व्यवहार उद्धव ठाकरे करण्याचा प्रयत्न करतायत त्यासाठी संजय राऊत गेला आहे. ही माहिती खरी की खोटी याची माहिती संजय राऊत किंवा त्याच्या मालकाने द्यावी. काँग्रेस कुठल्याही परिस्थितीत अशा कोणत्याही मागणीला होकार देणार नाही म्हणून त्यांच्यावर जास्त दबाव टाकला जात आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला.



निवडणूक म्हणजे ठाकरे कंपनीसाठी फक्त धंदा


निवडणुकीचा संपूर्ण प्रवास पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे आणि कंपनीसाठी फक्त व्यवहार आणि धंदा राहिलेला आहे. विधानसभा, लोकसभेचे तिकीट विकायचे आणि स्वतःचं घर चालवायचं हा उद्धव ठाकरेचा जो जुना धंदा आहे, त्या धंद्याचाच भाग म्हणजे संजय राऊतचा आजचा सांगली दौरा, अशी टीका नितेश राणे यांनी केली.



महाविकास आघाडी वसुलीखोर


संजय राऊतने आज पत्रकार परिषदेत थेट कबुलीच दिली आहे की जे वसुली करायचे त्यांना भाजपने घेतलं आहे. म्हणजे संजय राऊतने महाराष्ट्र आणि देशासमोर स्पष्ट कबुली दिली की महाविकास आघाडीत वसुली व्हायची. मविआचे नेते वसुली करायचे यावर त्याने शिक्कामोर्तब केलं आहे. हे वसुली सरकार असल्याचा आम्ही जो वारंवार आरोप करतो त्याला आज संजय राऊतने कबुली दिली, असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment