Friday, July 11, 2025

माढ्याचा तिढा लवकरच सुटणार

माढ्याचा तिढा लवकरच सुटणार

फलटण : माढा लोकसभेच्या रणांगणात उतरण्यापूर्वीच युद्धभूमी तयार करण्याचे काम धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडून सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी काल व आज माण व फलटण मतदारसंघाचा दौरा करत प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या भेटीनंतर जनतेला अपेक्षित असलेला निर्णय लवकरच घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांचे हे विधान म्हणजे माढा मतदारसंघामध्ये तुतारी हाती घेणार असल्याचे संकेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.


२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीपासून फारकत घेत मोहिते-पाटील घराने भाजपची कास धरली. या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नेटाने काम केले. त्यांच्या मताधिक्याच्या जोरावरच राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा पराभव झाला; परंतु गेल्या पाच वर्षांत मोहिते-पाटील व रणजितसिंह यांच्यातील संबंध टोकाचे बिघडले. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यास मोहिते-पाटलांचा विरोध होता.


त्यातून भाजपची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी धैर्यशील यांनी आपली प्रचार मोहीम सुरू केली होती. त्याला भाजपने साथ दिली नाही. त्यामुळे मोहिते-पाटील कार्यकर्त्यांनी तुतारी हातात घेण्याचा आग्रह केला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी भेट झाली. या भेटीचा तपशील बाहेर आलेला नाही, तसेच उमेदवारीबाबतही अद्याप काही जाहीर झालेले नाही.

Comments
Add Comment