- पाचवा वेद : भालचंद्र कुबल
१९४० ते ४५ चा काळ मराठी नाटकांच्या दृष्टीने नवतेचा काळ समजला जातो. मराठी नाटकातील प्रायोगिकता याच काळात प्रयोग क्षमतेच्या माध्यमातून शक्याशक्यतेच्या पातळीवर तपासली जात होती. भरतमुनी प्रणीत प्रहसन या नाट्यप्रारूपाला सादरीकरणाच्या अानुषंगाने कलाटणी मिळाली ती याच काळात. थोडक्यात मराठीतील ओरिजिनल प्रहसनाचे रूपांतरण इंग्रजाळलेल्या फार्स या नाट्यशैलीत मराठी नाटके रुजत चालल्याचे संकेत मिळत गेले. पुढील १५-२० वर्षांत फार्स हा नाट्यप्रकार लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचावा इतपत विकसित झाला. ‘अनरशाचा फार्स’,‘काका किशाचा’, ‘खोटेबाई परत जा’, ‘गुलाब छकडीचा फार्स’, ‘घेतलं शिंगावर’, ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’, ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ आणि अगदी अलीकडच्या ‘टूरटूर’ आणि ‘लफडा सदन’ या नाटकांची उदाहरणे देता येतील. याच पठडीतील ‘सर्किट हाऊस’ हे कोविड काळात बंद पडलेले नाटक नव्या नाट्यसंचात पुनरुज्जीवित होत आहे.
माझ्या मते फार्स नाट्यप्रकार दोन पद्धतीने (मेथड्सने) साकारला जातो. पहिली बुकिश मेथड (पुस्तकी पद्धत) आणि दुसरी इंप्रोव्हाझेशन मेथड (तात्कालस्फूर्त पद्धत). पुस्तकी पद्धतीत लेखकाने जसे लिहिले आहे तसे किंवा दिग्दर्शक जसे सांगेल तसे या तत्त्वांवर भर दिला जातो. मात्र इंप्रोव्हायजेशन पद्धतीत कथाबीजाच्या अानुषंगाने नटाच्या अभिनय कुवतेनुसार नाट्यफुलवले जाते. हा प्रकार सांघिकतेला प्राधान्य देतो. तर बुकीश मेथड ही वैयक्तिक आणि व्यक्तिसापेक्ष असते. सद्यकाळात या फार्स प्रकारांची दोन उदाहरणे देता येतील. पहिले म्हणजे संतोष पवार दिग्दर्शित मर्डरवाले कुलकर्णी आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘सर्किट हाऊस’. दोनही फार्सवर उल्लेखलेल्या प्रकारात मोडतात. पैकी सर्किट हाऊसवर भाष्य करणे गरजेचे आहे.
विजय केंकरे यानी पळा पळा कोण पुढे पळे तो या नाटकातून इंप्रोव्हायझेशन पद्धत वापरून वेगवेगळ्या नटसंचात या फार्स पद्धतीचा वापर प्रयोग म्हणून करून पाहिला आहे. ‘सर्किट हाऊस’ हे याच मेथडे विकसित रूप आहे. गौतम जोगळेकरांनी एका इंग्लिश नाटकावरून बेतलेले हे कथानक मूळ कथासूत्राला धक्का न लावता नटसंच आपापल्या पद्धतीने दिग्दर्शकीय सूचनांनुसार इंप्रोव्हाईज करत राहतात. त्यामुळे टाळीबाज वाक्ये, लेखनाचे नाट्यप्रयोजन, भरदार व्यक्तिचित्रण वगैरे बाबींना फाटा देऊन निव्वळ गतीमान सादरीकरण या प्रयोगातून पाहायला मिळते. त्यातही विनोदी घटनांची गतीमानता एवढ्या पराकोटीला नेऊन ठेवलीय की, प्रेक्षकांना विचार करायलाही वेळ दिलेला नाही. त्यामुळे घटनात्मक कथासूत्र गौण ठरवून त्या घटनांचा संदर्भ वापरून नाटक पुढे नेण्यात विजय केंकरे आणि संजय नार्वेकर अक्षरशः बाजी मारून नेतात. मंत्री पोपटराव चावरे (संजय नार्वेकर) हे पात्र नाटकातील प्रत्येक प्रसंगात आहेत. शक्यतो एकखांबी नाटकाची रचना ही प्रमुख व्यक्तिरेखेभोवती घुटमळत असते. त्यामुळे नाटकाचे कंस्ट्रक्शन काही प्रसंगात मुख्य व्यक्तिरेखेला अभिनयातील दमछाक होण्यापासून बचावणारे असते, परंतु संजय नार्वेकर ज्या एनर्जीने नाटक सुरू करतात, त्याच एनर्जीने संपवतात. त्यांच्या धावपळीने प्रेक्षक दमतो पण ते नाही. फार्स हा विनोदावर आधारलेला नाट्यप्रकार असल्याने अभिनयातील चारही अंगांचे एकत्रित मिश्रण यात विपर्यासी पद्धतीने येते. त्यामुळे अशा विनोदास ‘विपर्यासी विनोद’ म्हणून यापुढे संबोधावयास हवे. विनोद तेव्हाच घडतो जेव्हा एखादी गोष्ट चुकीची, अस्वस्थ किंवा धमकावणारी दिसते; परंतु त्याच वेळी ती घटना योग्य, स्वीकार्य किंवा सुरक्षित वाटते.
पोपटरावचा बाहेरख्यालीपणा वाढल्यामुळे विरोधी पक्षाच्या सहकारी मंत्र्याच्या सेक्रेटरी डाॅली बरोबर मजा मारायला तो सर्किट हाऊस बुक करतो. मजा मारणे रहाते बाजूला आणि त्या रूमवर कोणीना कोणी येत राहतात. पोपटरावांच्या बाहेरख्याली प्लानचा पार विचका होण्याच्या प्रसंग-मालिकेला ‘सर्किट हाऊस’ असे नाव देण्यात आले आहे. यात लक्षात राहतात ते सहाय्यक भूमिका करणारे पाच कलावंत. पहिल्या एंट्रीलाच अंकुर वाढवे हा डिटेक्टिव्ह म्हणून वावरायला सुरुवात करतो, त्याच वेळी कळून चुकते की काहीतरी अन् आॅफिशियल घडणार तरी आहे किंवा घडलेले तरी आहे. अंकुरच्या नाटकातल्या तीनही पोझिशन्स तो एक कसलेला रंगकर्मी असल्याची साक्ष देतात. पहिली फ्लाॅवरपाॅटची पोझिशन, खिडकी डोक्यावर पडल्यामुळे मुर्छीत झाल्याची पोझिशन व तिसरी कपाटात लटकवल्याची पोझिशन…! या तिन्ही पोझिशन्स अत्यंत कठीण आहेत, पण अंकुर त्या सहजगत्या निभावून नेतो. दुसरी सहाय्यक भूमिका करणारे प्रमोद कदम. डाॅलीच्या भडक माथ्याच्या गोवनीज नवऱ्याची भूमिका काही काही प्रसंगात तर टाळी मिळवून जाते. संजय नार्वेकर जशी पश्चिम महाराष्ट्रातील भाषा बोलतात तसेच प्रमोद कदम गोंयनीज व कृष्णा चतुर्भुजची वैदर्भी ऐकताना मुळात भाषिक गोडवा या नाटकातील गुंतागुंत पुढे नेण्यास मदत करतो. मॅनेजर झालेल्या नामांतर कांबळे देखील मंत्र्याशीही कडक वागण्याच्या धोरणीपणामुळे लक्षात राहातो. मैना चावरे हे शेवटच्या क्षणी सर्किट हाऊसवर गोंधळात गोंधळ वाढवणारे एक कॅरेक्टर. आता शेवटी हेच बाकी होते म्हणत आपण जसा कपाळावर हात मारून घेतो, सावित्री मेधातुल यांचं नाटकातील कॅरेक्टर याच पठडीतलं आहे. कायम दारूची बाटली घेऊन फिरणारी, तर्र असणारी मैना म्हणजे विनोदी सिच्युएशनचा कहर आहे…आणि सरते शेवटी उल्लेख आणि कौतुकास पात्र असलेला गणेश पंडित. बऱ्याच वर्षांनी गणेश व्यावसायिक रंगभूमीवर आलाय. त्रेधा कशी व्यक्त करावी हे गणेश पंडितांकडून शिकण्यासारखं आहे. हे पाच-सहा सहाय्यक कलाकार संजय नार्वेकरांना सातत्याने ‘विपर्यासी विनोद’ फुलवायला मदत करत राहतात. दोन स्त्रीपात्रांचा उल्लेख या लेखात आवर्जून टाळत आहे कारण त्यांची भूमिकेशी नसलेली इन्व्हाॅलव्हमेंट. दोन प्रसंगात तर संजय नार्वेकरांच्या मागे त्यांनी केलेल्या विनोदावर डाॅली हसत असते. फार विचित्र दिसते ते…! असो.! टीका करण्याइतपत नाटकाची बांधणी बिलकूल नाही. करमणूक म्हणून विजय केंकरेंनी ‘सर्किट हाऊस’ नामक घातलेला घाट या सुट्टीत धमाल उडवणार यात शंकाच नाही.