
मुंबई : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ सध्या केवळ त्यांच्या मैदानातील कामगिरीमुळेच नाही, तर नेतृत्वबदलामुळेही सातत्याने चर्चेत आहे. सध्या चालू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२४ (IPL 2024) स्पर्धेत मुंबईचा संघ हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळत आहे. आयपीएलच्या १७व्या हंगामापूर्वी मुंबईने ५ वेळचा आयपीएल विजेता कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) काढून हार्दिककडे नेतृत्व सोपवण्यात आले. ही गोष्ट अनेक चाहत्यांच्या पसंतीस पडलेली नाही. त्यातच आता मुंबई इंडियन्सला सलग तीन पराभवांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे हार्दिकवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
राजस्थानविरुद्धचा सामना मुंबईच्या संघाने गमावल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने हार्दिक पंड्याची कर्णधारपदावरुन उचलबांगडी केली जाऊ शकते असं मत 'क्रिक बझ'शी बोलताना व्यक्त केलं. मात्र त्याच चर्चेत सहभागी असणाऱ्या विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) त्यावर दिलेली प्रतिक्रिया सध्या क्रिकेट प्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
यापूर्वीही अनेक संघांचे नेतृत्व बदल झाले
यापूर्वीही २ संघांनी कर्णधार बदलले आहे, पंजाब व चेन्नईने असे केले आहे. चेन्नईने जडेजाला कर्णधारपद दिले होते आणि नंतर धोनीने पुन्हा कर्णधाराची जबाबदारी स्विकारली. पण हे हंगाम चालू असताना घडले होते. मला वाटत नाही की मुंबई इंडियन्स आत्ता कर्णधार बदलण्याचा विचार करत असतील. तुम्ही तीनच सामन्यानंतर कर्णधार बदलू शकत नाही. त्यामुळे संघाला योग्य संदेश जात नाही. मात्र, सात सामन्यांनंतर जेव्हा स्पर्धा अर्ध्यात असेल, तेव्हा ते कामगिरीच्या आधारावर निर्णय घेऊ शकतात, असे सेहवागने म्हटले.
रोहितच्या नेतृत्वात सलग पाच सामन्यांमध्ये पराभव
मुंबईचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली असतानाही सलग पाच सामने पराभूत झाला होता. तेव्हा ५-० अशी परिस्थिती होती. त्यानंतरही त्यांनी पुढच्या टप्प्यात आगेकूच केली होती. त्यामुळे ते हार्दिकबरोबरची सध्याची परिस्थिती संयमाने हाताळतील. मुंबई संघ सध्या ०-३ वर आहे. मात्र यानंतरही हे अंतर वाढत राहिलं तर ती संघ व्यवस्थापनाच्या संयमाची परीक्षा ठरेल," असं सेहवाग म्हणाला.