स्वयंपाकाचा गॅस; आपले हक्क आणि कर्तव्य…

Share

स्नेहल नाडकर्णी, मुंबई ग्राहक पंचायत

काही अपवाद वगळता, स्वयंपाक आणि स्वयंपाकघर हे महिलांच्या जिव्हाळ्याचे विषय. आपल्या कुटुंबीयांच्या सुदृढ व निरोगी प्रकृतीसाठी त्या प्रदूषणविरहीत, पोषक अन्नघटकांची निवड करण्याबाबत चोखंदळ असतात. पण त्याचबरोबर अन्न शिजवण्यासाठी लागणाऱ्या प्रेशर कुकर, मिक्सर, गॅस शेगडी यांसारख्या उपकरणांची निवडही त्यांनी सजगतापूर्वक केली पाहिजे. ग्राहकाला, खाद्य पदार्थांची खरेदी करताना वेष्टनावरील माहिती वाचणे, वस्तूचे अचूक वजन पडताळणे, भेसळ विरहीत पदार्थांची निवड करता येणे, आयएसआय (ISI) चिन्ह असलेल्या घरगुती उपकरणाची खरेदी करणे, म्हणजेच त्याचा माहिती मिळवण्याचा, निवडीचा, सुरक्षिततेचा हक्क जोपासणे ह्याची माहिती नसते.

स्वयंपाकघरात वापरण्यात येणाऱ्या दररोजच्या वापरातील गॅस सिलिंडरला एक्स्पायरी डेट असते हे कित्येकांना माहीत नसते. गॅस सिलिंडर लोखंडाचा बनलेला असतो. कालांतराने लोखंडाची झीज झाल्याने किंवा बदलत्या हवामानामुळे गॅस सिलिंडरला गंज आल्याने, भरलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दुर्घटना घडू नये यासाठी गॅस सिलिंडरवर एक्स्पायरी डेट, महिना A (जानेवारी, फेब्रुवारी, मार्च), B (एप्रिल, मे, जून), C (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर), D (ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर) यापैकी एक अक्षर व त्यापुढे वर्ष, या स्वरूपात लिहिलेली असते. उदा. C२५ म्हणजे सप्टेंबर २०२५ नंतर या सिलिंडरमध्ये गॅस न भरता तो पडताळणीसाठी परत कंपनीत पाठवला जाणे अपेक्षित असते. म्हणून गॅस सिलिंडर घेताना त्यावरची एक्स्पायरी डेट बघून घेणे सुरक्षित असते.

ग्राहकाला सुरक्षाकवच म्हणून गॅस डीलरने प्रत्येक ग्राहकाचा विमा उतरवणे बंधनकारक असते. गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन काही दुर्घटना घडली तर विमा कंपनीला कळवण्याची जबाबदारी गॅस डीलरची असते. म्हणून दुर्घटनेची माहिती त्वरित गॅस डीलरला लेखी खरूपात देणे ग्राहकाचे कर्तव्य आहे. विमा कंपनीचा अधिकारी दुर्घटनास्थळी पोहोचून घटनेची कारणमीमांसा करून विमा पॉलिसीनुसार ग्राहकाच्या नुकसानभरपाईची रक्कम ठरवतो. दुर्घटना टाळण्यासाठी गॅस शेगडी, गॅस जोडणीची तपासणी करून घेणे ग्राहकाच्या दृष्टीने हितकारक असले तरी बंधनकारक नाही. पाईप गॅसच्या बाबतीत मात्र दर पाच वर्षांनी तपासणी करणे गॅस एजन्सीला बंधनकारक आहे.

पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या आदेशानुसार ग्राहक वर्षाला १२ पेक्षा जास्त गॅस सिलिंडरची मागणी करू शकतो. पण त्यातील फक्त १२ सिलिंडर अनुदानित दराने मिळतात. त्यापेक्षा जास्त सिलिंडरसाठी पूर्ण रक्कम आकारली जाते. ISI चिन्ह असणे ही त्या वस्तूच्या गुणवत्तेची व ग्राहकाच्या सुरक्षिततेची हमी असते. ISI चिन्ह असलेली स्टीलच्या तारेची जाळी असणारी, गॅस सिलिंडर व रेग्युलेटरला जोडणारी ट्यूब आज बाजारात उपलब्ध आहे. उंदरांनी कुरतडून, गरमीमुळे वितळून किंवा कापली जाऊन होणारी गॅस गळतीची संभाव्यता टाळण्यासाठी रबरट्यूब ऐवजी अशा ट्यूब वापरणे सुरक्षित असते. ह्या ट्यूबची एक्स्पायरी डेट ५ वर्षे असते जी ट्यूबवर छापलेली असते. लांबीनुसार त्याची किंमत बदलते. अशी गॅसची जोडणी (सिलिंडर, नळी, शेगडी) घरात असणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे ठरावीक काळाने ती तज्ज्ञ तंत्रज्ञाकडून तपासणी करून घेणे उचित ठरते.

अमृतसर येथे राहणारे बन्सीलाल तनेजा यांनी अशी तपासणी करून घेण्याचे ठरवले. तपासणीच्या वेळी त्यांना जगदेव गॅस डीलरने रु. ६०, रु. ७० बाजारभावाने मिळणाऱ्या गॅस ट्यूबसाठी रु. १९० व तपासणीसाठी रु. ४० असे एकूण रु. २३० भरण्यास भाग पाडले. पैसे भरूनही तपासनीस त्यांच्याकडे गेलाच नाही. त्यांनी जिल्हा अन्न व पुरवठा नियंत्रकाकडे जगदेव गॅस डीलर विरोधात तक्रार केली. नियंत्रकाच्या मध्यस्थीमुळे गॅस डीलरने तक्रारदाराचे रु. २३० परत केले, तरी गॅस डीलर त्यांना नियमित गॅस सिलिंडर देण्यास दिरंगाई करू लागला. होणाऱ्या गैरसोयीमुळे आणि ते स्वतः सजग ग्राहक होते म्हणूनच त्यांनी अन्याय सहन न करता जगदेव गॅस डीलर विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जिल्हा मंचाकडे तक्रार करून गॅस डीलरकडून रु. ५०००० नुकसानभरपाई मिळण्याबाबत मागणी केली. भारत पेट्रोलियम महामंडळाच्या नियमानुसार आम्ही कारवाई केली असे लिखित उत्तर गॅस डीलरने जिल्हा मंचाला दिले. रु. २००० दाव्याचा खर्च तक्रारदारास गॅस डीलरने द्यावा असा निर्णय जिल्हा मंचाने दिला. दोन्ही पक्षांना हा निर्णय मान्य नसल्यामुळे दोन्ही पक्षांनी राज्य आयोगाकडे

वेगवेगळे अपील केले. गॅस डीलरचा दावा राज्य आयोगाने फेटाळला. बन्सीलाल तनेजांचा दावा दाखल करून घेतला. जिल्हा मंचाने सांगितलेल्या रु. २००० ऐवजी दाव्याच्या खर्चाची रक्कम वाढवून रु. १०००० गॅस डीलरने तक्रारदारास द्यावे असा निर्णय राज्य आयोगाने दिला. गॅस डीलरने राज्य आयोगाच्या निर्णयाविरोधात राष्ट्रीय आयोगात अपील केले. गॅस डीलरने बन्सीलाल तनेजांना गॅस ट्यूब घेण्यास जबरदस्ती करणे आणि त्यांना नियमित गॅस पुरवठा न करणे या समस्येचे निराकरण म्हणून राज्य आयोगाचा निर्णय कायम ठेवत गॅस डीलरने केलेले अपील राष्ट्रीय आयोगाने फेटाळले. तसेच नियमानुसार तनेजांना त्यांच्या मागणीनुसार अखंडित गॅस पुरवठा करण्याविषयी गॅस डीलरला ताकीद देऊन अमृतसर उपायुक्त तसेच अन्न व पुरवठा नियंत्रक यांनी गॅस डीलरकडून बन्सीलाल यांना नियमित गॅसपुरवठा होईल याची खातरजमा करून घेण्याचा निर्देश दिला. त्यात खंड पडल्यास नागरी प्रशासनाने गॅस डीलर विरोधात योग्य ती कारवाई करावी असा आदेश दिला. सजग ग्राहकत्वाचे महत्त्व बन्सीलाल तनेजांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केले. आपल्या हक्काविषयी जागरूक राहून अन्यायाविरोधात आवाज उठवला, तर आपल्याला नक्कीच दाद मिळते.
mgpshikshan@gmail.com

Recent Posts

पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला कशी देणार प्रतिक्रिया, गुरुवारी बिहारमध्ये कळणार

दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…

13 minutes ago

१० कोटींचा बँक घोटाळा! वरिष्ठ मॅनेजर, उद्योजक व एजंटला ५ वर्षांची शिक्षा

मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…

24 minutes ago

Sachin Tendulkar: “हल्ल्याच्या बातमीने धक्काच बसला…” पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट

मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…

55 minutes ago

Mumbai BMW hit and run case : गाडी थांबवता आली असती, पण माणुसकी हरवली…

वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…

56 minutes ago

Ladki Bahin Yojana : तारीख ठरली! लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये

मुंबई : महायुती सरकारने (Mahayuti) महिलांच्या आर्थिक दृष्टया सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana)…

1 hour ago

Ram Charan: अभिनेत्याच्या जिद्दीला सलाम! केलं कठोर व्रत आणि अखेर चित्रपटाला मिळालं ऑस्कर!

मुंबई: जेव्हा चित्रपट रिलीज होणार असतो तेव्हा प्रेक्षकांना तो आवडेल की नाही , चित्रपटाला यश…

1 hour ago