राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदींचा एल्गार
जयपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज राजस्थानमधील चुरु येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. ‘काँग्रेसने जनतेसाठी नव्हे तर केवळ कुटुंबासाठी काम केले आहे आणि आम्ही सातत्याने लोकांसाठी काम करत आहोत’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच आमच्या सरकारने प्रत्येक मुस्लिम कुटुंबाला संरक्षण दिल्याचा दावाही त्यांनी केला.
तिहेरी तलाकमुळे मुस्लिम कुटुंबांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उल्लेख करत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तिहेरी तलाकवरील कायदा आमच्या मुस्लिम भगिनींना मदत करत आहे. माझ्या मुस्लिम माता-भगिनींनो हे समजून घ्या की, तिहेरी तलाकचा केवळ तुमच्या जीवाला धोका नव्हता तर माझ्या मुस्लिम मुलींच्या डोक्यावर टांगती तलवार होती. मोदींनी तुमचे रक्षण केले नाही तर मोदींनी प्रत्येक मुस्लिम कुटुंबांचे रक्षण केले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
तसेच मुस्लिम कुटुंबांतील वडिलांना एक भीती असायची अन त्यांना एक प्रश्न पडायचा की, मुलीचे लग्न झाल्यानंतर तिला दोन तीन मुले होतील, अन् त्यानंतर तिचा पती तिहेरी तलाक करून तिला घरी पाठवेल, मग मी त्या मुलीचा सांभाळ कसा करू? आई, मुलगी, भाऊ सगळेच काळजीत पडले होते. संपूर्ण परिवार तिहेरी तलाकच्या नावाखाली टांगत्या तलवारीखाली जगत होते. मोदींनी केवळ मुस्लिम भगिनींचेच नव्हे तर मुस्लिम कुटुंबांचे प्राणही वाचवले आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आतापर्यंत जे काही केले ते केवळ ट्रेलर आहे. आपल्याला खूप काही करायचे आहे, बरीच स्वप्ने बाकी आहेत. देशाला खूप पुढे न्यायचे आहे. भाजपा सर्वकाही करते. आम्ही जाहीरनामा देत नाही तर संकल्प पत्र जारी करतो. दिलेली बहुतांश आश्वासने आम्ही पूर्ण केली आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी वक्तव्य केले.