Saturday, May 10, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Panvel To Karjat: आता पनवेल ते कर्जत प्रवास सुपरफास्ट!

Panvel To Karjat: आता पनवेल ते कर्जत प्रवास सुपरफास्ट!

केवळ ३० मिनिटांचा होणार प्रवास; जाणून घ्या कसं


मुंबई : मुंबईकर पूर्वी लांबचा प्रवास करण्यसाठी टाळाटाळ करत असत. मात्र मुंबईकरांचा आता लांबचा प्रवास अगदी सुपरफास्ट होणार आहे. कारण पनवेल ते कर्जत अंतर अवघ्या ३० मिनीटात पार करता येणार आहे. ठाणे-दिवा नवीन पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर आता लवकरच पनवेल ते कर्जत अशी लोकल ट्रेन सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. पनवेल-कर्जत (Panvel To Karjat) उपनगरीय रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून या प्रकल्पातील सर्वात मोठा वावर्ले बोगद्याचे ९० टक्के पूर्ण झाले आहे. तसेच तीन हजार १४४ मीटर लांबीच्या पुलाचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) दिली आहे.


कर्जत आणि पनवेलमधील प्रवाशांना ठाणे किंवा कुर्लाला वळसा घालून प्रवास करावा लागतो. जर पनवेल-कर्जत अशी थेट लोकल सुरु झाली तर त्याचा फायदा अनेक प्रवाशांना होऊ शकतो. त्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प 3 (MUTP 3) अंतर्गत पनवेल ते कर्जत हा दुहेरी रेल्वे मार्गाचे काम हाती घेतले आहे. येत्या काही वर्षांत पनवेल ते कर्जत या मार्गावर लोकल धावणार आहेत. या दुहेरी मार्गामुळे पनवेल ते कर्जत दरम्यान राहणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.



असा असेल पनवेल ते कर्जत लोकल मार्ग


पनवेल, चौक, मोहपे, चिखले, कर्जत अशी पाच स्थानके असतील. याशिवाय फलाट, पादचारी पूल, भुयारी मार्ग आदी कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहेत. ३.१२ किलोमीटरच्या तीन रेल्वे बोगी असतील. ५६ किमी लांबीच्या दुहेरी रेल्वे मार्गावर पाच उड्डाणपूल, दोन रेल्वे उड्डाणपूल, सहा मुख्य पूल आणि ३७ छोटे पूल असणार आहेत. या मार्गावर नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे उभारण्यात येणार आहेत. वावर्ले बोगदा पूर्ण झाल्यावर हा मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा असेल. तसेच पनवेल ते कर्जत लोकल २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment