‘काँग्रेसची गॅरंटी ही चायना मालासारखी’
भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा खोचक टोला!
मुंबई : भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपाचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी काँग्रेसने केलेल्या खोट्या आश्वासनांवर टीका केली आहे. अनेक वर्ष सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने गरीबी हटावासारखी आश्वासने दिली. मात्र त्यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाही. काँग्रेसने दिलेली गॅरंटी ही चायना मेड वस्तूंसारखी आहे अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली.
नक्कल करायलाही अक्कल लागते आणि ती अक्कल काँग्रेसकडे नाही, हे मोदी सरकारची नक्कल करुन काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाला दाखवून दिले आहे. केवळ एक घराण्याच्या विकासाची गॅरंटी देणाऱ्या काँग्रेसच्या नव्या आश्वासनावर जनता फसणार नाही, उलट देशाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या मोदी सरकारच्या पारड्यात प्रचंड बहुमताने सत्तेचे दान टाकेल असा खोचक टोला केशव उपाध्ये यांनी केला.
गेल्या काही वर्षात प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी झिडकारले तरीही जनतेच्या फसवणुकीसाठी मोहब्बत की दुकाने असे फसवे मुखवटे घालून काँग्रेस नेते जनतेकडे मतांची याचना करत आहेत. ‘गरीबी हटाव’ असा नारा देणाऱ्या काँग्रेसच्या काही मोजक्या नेत्यांची आणि पक्षाला वेठीस धरणाऱ्या गांधी घराण्याची गरीबी हटली, मात्र देश अधिकच गरीब होत गेला. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या नावाखाली बँकाच्या तिजोऱ्या भरून शेतकऱ्यांचे कर्जाचे ओझे कायम ठेवण्याचा पराक्रम काँग्रेस सत्ताधीशांनी केला आहे, असं उपाध्ये यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाला विकासाची गॅरंटी दिली तसेच ती पूर्णही करुन दाखवली. पंतप्रधान केवळ गॅरंटीच्या घोषणा करत नाहीत, तर गेल्या दहा वर्षात त्यांनी दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण केल्याचे देशाने अनुभवले आहे. प्रत्येक क्षेत्रातील मोदी की गॅरंटी खरी ठरते हे लक्षात आल्यावर आता त्या गॅरंटीची नक्कल करत न्याय आणि विकासाच्या कागदी घोषणा करुन काँग्रेस पक्ष देशातील जनतेला पुन्हा मुर्ख बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत. मात्र अशा अनेक फसवणूकीतून जनता यापूर्वी गेल्याने, आता नक्कल कामाला येणार नाही असे केशव उपाध्ये यांनी सांगितले.