कंगना रणौतची बोचरी टीका
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी हे आईच्या महत्त्वाकांक्षेचे बळी आहेत. राहुल गांधी आणि त्यांची बहिण प्रियंका यांना त्यांच्या आई सोनिया गांधी यांनी दबाव टाकून जबरदस्तीने राजकारणात आणले आहे, अशी बोचरी टीका अभिनेत्री तसेच हिमाचल प्रदेशाच्या मंडीतील भाजपा उमेदवार कंगना रणौतने राहुल गांधींवर केली आहे.
एका वृत्तवाहिनीला मुलाखतीत कंगना रणौतने असे सांगितले की, थ्री इडियट्स चित्रपटातील मुलं ज्याप्रमाणे घराणेशाहीचे बळी पडले तसेच राहुल गांधी हे त्यांच्या आईच्या महत्त्वाकांक्षेचे बळी पडले आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांनी राजकारणातच राहण्यासाठी त्यांच्या आईकडून दबाव टाकण्यात आला होता. त्यांच्यावर जबरदस्ती न लादता त्यांना मनमोकळे जीवन जगण्यासाठी परवानगी द्यायला हवी होती, असे कंगना रणौतने म्हटले.
राहुल गांधी यांनी अभिनायात कारकीर्द केली असती तर ते एक चांगले अभिनेते बनू शकले असते. काँग्रेस वंशजाना इतर व्यवसायात काम करण्याची परवानगी द्यायला हवी होती. त्यांच्या आईकडे संपत्तीची कमी नाही, राहुल गांधींची आई या जगातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत असेदेखील कंगना रणौतने सांगितले.
५० पेक्षा अधिक वय असूनही युवा नेते कसे?
राहुल गांधी यांचे वय ५०हून अधिक आहे. मात्र तरीही त्यांना युवा नेते म्हटले जाते. ते खूप एकाकी आहेत, त्यांच्यावर राजकरणात राहण्याचा दबाव टाकला जात आहे असा दावा कंगना रणौत यांनी केला.