Sunday, July 14, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखइंडिया आघाडीचा लोकतंत्र बचावाचा पोकळ नारा

इंडिया आघाडीचा लोकतंत्र बचावाचा पोकळ नारा

दिल्लीच्या रामलीला मैदानात केंद्रातील मोदी सरकारला आव्हान उभे करण्यासाठी इंडिया आघाडीची रॅली रविवारी काढण्यात आली होती. या रॅलीत काश्मीरमधील डॉ. फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यापासून ते दक्षिणेकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण जमले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने केलेल्या अटकेनंतर आपच्या पुढाकाराने इंडिया आघाडीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न झाला. नरेंद्र मोदी यांना विरोध करणारे देशातील झाडून सगळे विरोधी पक्षनेते रामलीला मैदानावरील व्यासपीठावर प्रचंड दाटीवाटीने बसलेले होते. देशाचे संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे.

आम्ही सर्वजण देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी, लोकतंत्र टिकविण्यासाठी एकत्र आल्याचा नारा अधूनमधून २६ पक्षांच्या नेत्यांकडून दिला जात होता. पण, हा नारा राज्याराज्यांत पोहोचण्याअगोदर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीतील मतभेद लपून राहिले नाहीत. एवढेच नव्हे तर आगामी लोकसभा निवडणुकीत ऐकमेकांच्या विरोधात लढण्याचा निर्णय दिल्लीतील सभेनंतर घेण्यात आल्यामुळे, ही आघाडी नावापुरता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी ही इंडिया आघाडी स्थापन झाली, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही; परंतु या आघाडीला धक्के बसताना दिसत आहेत. यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. त्यामुळे काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाच्या युतीला कसे हरविता येईल, याची रणनिती ममता बॅनर्जी यांनी स्वत:च आखली.

आता जम्मू-काश्मीरमध्येही इंडिया आघाडीत धुसफूस असल्याची चर्चा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेच्या एकूण पाच जागा आहेत. पीडीपी पक्षप्रमुख आणि जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी, नॅशनल कॅान्फरन्सच्या असहकार्यामुळे काश्मीरच्या तीनही लोकसभा जागांवर पीडीपीकडे उमेदवार उभे करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे वक्तव्य केले आहे. मेहबुबांच्या या विधानावरून इंडिया आघाडीत मोठी धुसफूस आणि समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येते. नॅशनल कॉन्फरन्सने इंडिया आघाडीमध्ये जम्मूच्या दोन जागा काँग्रेससाठी सोडल्या आहेत, तर उर्वरित तीन जागांवर स्वत:चे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षाने कुठून लढायचे याची नॅशनल कॉन्फरन्सने चर्चा केली नाही, असा मुक्ती यांचा आरोप आहे.

पाटणा ते दिल्लीतील रामलीला मैदानापर्यंत झालेल्या इंडिया अलायन्सच्या सभा आणि रॅलींमध्ये मेहबुबा सहभागी झाल्या आहेत. मुफ्ती या प्रत्येक स्टेजवर उपस्थित आहेत. फारुख अब्दुल्लाही त्यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेतृत्व करताना दिसत आहेत. मात्र जागावाटपावर तीनही जागांवर ताळमेळ होताना दिसत नाही. दुसरीकडे काँग्रेसचे राजपुत्र राहुल गांधी खरंच भाजपाला आव्हान देण्याच्या मन:स्थितीत आहेत का?, असा सवाल केरळचे मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते पिनराई विजयन यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधी हे केरळमधल्या वायनाडमधून कशासाठी लढत आहेत?, कारण तिथे भाजपाशी त्यांची लढाईच नाही. हिंमत असेल, तर त्यांनी भाजपा विरोधात उत्तर प्रदेशातून लढावे, अशा शब्दांमध्ये पिनराई विजयन यांनी राहुल गांधींना आव्हान दिले. त्यामुळे “इंडिया” आघाडीत राहुल गांधींच्याच उमेदवारीवरून फूट पडल्याचे उघड्यावर आले.

राहुल गांधींनी वायनाड मतदार संघातून आपली उमेदवारी जाहीर करताच कम्युनिस्ट पार्टीचे नेते आधीच खवळले आहेत. देशभरामध्ये मोदी सरकार विरोधात एवढी मोठी आंदोलने झाली, तिथल्या प्रत्येक आंदोलनामध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या वायनाडमधल्या उमेदवार एनी राजा या आघाडीवर होत्या. पण त्यावेळी राहुल गांधी कुठे होते?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या सुभाषिनी अली यांनी राहुल गांधींच्या कार्यक्षमतेवर ठळक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल गांधी खरंच भाजपा विरोधात लढत असतील, तर ते केरळमधून लोकसभा निवडणूक का लढवत आहेत? त्यांनी भाजपाचा गड असलेल्या उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवावी. तिथे भाजपाचा पराभव करून दाखवावा, तर लोक त्यांचे नेतृत्व स्वीकारतील.

केरळमधल्या वायनाडमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवून राहुल गांधी जनतेला नेमका कोणता संदेश देऊ इच्छित आहेत?, असा खोचक सवाल सुभाषिनी अली यांनी केला. “इंडिया” आघाडीच्या व्यासपीठावर राहुल गांधी आणि सगळे कम्युनिस्ट पक्ष एकत्र दिसतात. पण प्रत्यक्षात केरळच्या लोकसभेच्या मैदानात ते एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत आणि त्यामुळेच कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांनी राहुल गांधींवर थेट तोफा डागल्या आहेत. त्यामुळे, देशातील स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. लोकतंत्र वाचविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे, अशी भाषणबाजी व्यासपीठावरून करणारी विरोधी पक्षांतील नेते मंडळींचा खरा स्वार्थ हा निवडणुकीच्या जागा जिंकण्यात कसा आहे, हे प्रकर्षाने दिसून आले. विरोधी पक्षांच्या ‘घमंडिया’ आघाडीचे शक्तिप्रदर्शन हे भीतीपोटी आहे आणि पुन्हा मोदी सरकार आले तर आपले काही खरे नाही, ही भीती त्यामागे आहे, हे आता लपून राहिलेले नाही. सगळे शरीराने एकत्र येत आहेत, पण मनातून दुभंगलेले आहेत, ही वस्तुस्थिती मान्य करायला हवी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -