गजानन महाराज – प्रवीण पांडे, अकोला
गजानन भक्त संध्या कुलकर्णी, सातारा यांना आलेला गजानन महाराजांचा अनुभव. शेगावचे श्री गजानन महाराज म्हणजे भक्त वत्सल अशी माऊलीच आहेत. इतर भक्तांना जशी महाराजांची प्रचिती येते तशीच मला देखील मिळाली. तो अनुभव आपणा सर्वांना अगदी आवर्जून सांगावा असे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.
मी नास्तिक नाही. पण खूप देव देव करणे, पोथ्या पुराणे वाचणे असे मला कधी करावे असे वाटतच नव्हते. पण पाच-सहा वर्षांपूर्वी एका मैत्रिणीच्या आग्रहामुळे दर गुरुवारी माऊलींचा एक अध्याय वाचायला हवा अशा समूहामध्ये मी सहभागी झाले. असे म्हणाना की महाराजांनीच मला हा मार्ग दाखविला असावा. गुरुवार आला की नाखुशिनेच मी अध्याय वाचायला सुरुवात केली होती. पुढे अध्याय वाचता वाचता मला नकळत गुरुवार कधी येतो आणि मी अध्याय वाचेन असे व्हायला लागले. एक ओढ वाटू लागली आणि मला काही अनुभव ही यायला लागले. तस-तसे महाराजांवरची माझी श्रद्धा आणि निष्ठादेखील वाढू लागली. वाचन करता करता खूप जणांचे बरेच अनुभव ही माझ्या वाचनात येऊ लागले. कधी कोणाच्या स्वप्नात येऊन महाराज आशीर्वाद देत होते तर कधी कोणाचे प्रसाद भक्षण करून तेथेच आहेत याची प्रचिती ते देत होते. असे बरेच जणांचे अनुभव वाचून कुठेतरी मलाही वाटू लागली की महाराजांनी मला देखील अशीच प्रचिती द्यावी. मी जो नैवेद्य दाखवते त्यातील निदान एखादा कण तरी त्यांनी खावा. पण मी परत मनाला समजावत असे की मी, तर काहीच देव देव करत नाही. मग महाराज माझ्या स्वप्नात कसे येतील आणि मी दिलेला प्रसाद ते कसे भक्षण करतील. मी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. असे दरवेळी मी मनाला समजावीत होते.
पण म्हणतात ना एकदी आस लागली की माहीत असूनही मी ज्यावेळी नैवेद्य दाखवत असे त्यावेळी महाराजांच्या फोटोकडे बघून नकळतपणे हात जोडून विनवणी करीत म्हणून जायची “महाराज तुम्ही माझ्या घरी येऊन मी श्रद्धेने अर्पण केलेल्या प्रसादाचा एक कण तरी खाल ना? कारण मी काही तुमची इतकी भक्ती करत नाही किंवा मी तुमची निस्सीम भक्तदेखील नाही आणि महाराज प्रसाद ग्रहण करीत नाहीत, असे पाहून जरा रागवून “असू दे हा प्रसाद आता मीच खाते” अशा लटक्या रागाने मी महाराजांकडे बघत भक्तिभावाने तो प्रसाद, पिठलं भाकरी, जे काही केले असेल ते मी खात असे आणि तृप्त होत असे. पण मनात नेहमी असे वाटायचे ‘नैवेद्य नाही खात तर निदान एकदा तरी माझ्या स्वप्नात येऊन मला अनुभव द्यायला महाराजांना काय हरकत आहे’ अशी बरीच वर्षे निघून गेली. महाराजांसोबत या गोष्टीवरून मी सारखी तर भांडत होतेच.
प… पण… परवा पहाटे पहाटे महाराजांनी एक चमत्कार दाखवला. तो म्हणजे चक्क महाराज माझ्या स्वप्नात आले. काय स्वप्न पडले ते आता मी तुम्हाला सांगत आहे.
मी कुठेतरी बाहेर अनोळखी ठिकाणी अशा एका घरात आहे आणि पिठलं, भाकरी, भात असा नैवेद्य तयार केला आणि जिथे गजानन महाराजांचा फोटो होता तिथे आले आणि नैवेद्याचे ताट समोर ठेवले. मला आठवते, त्यावेळी त्या ताटात फक्त भात आणि पिठले किंवा डाळ(वरण)असे वाढले होते. मी ते ताट महाराजांच्यासमोर ठेवून नैवेद्य दाखवला आणि मनातल्या मनात परत तेच म्हणाले, ‘महाराज मी आपणास नैवेद्य दाखवत आहे पण मला माहिती आहे, दरवेळेप्रमाणे तुम्ही यातला एक कणही ग्रहण करणार नाही. पण असो. तुम्ही हा प्रसाद खा.’असे म्हणून मी नैवेद्य दाखवून ते ताट घेऊन वळले आणि तेवढ्यात मला मागून हाक ऐकू आली. “मला नैवेद्य दाखविलाय ना? मग ते ताट घेऊन कुठे चाललीस? दे इकडे मला ते ताट” काय घडतंय हे मला दोन मिनिटे कळलेच नाही. मागून कोणीतरी बोलले तेच लक्षात आले आणि मी मागे वळून बघितले, तर महाराज फोटोमधून मला हात करत होते की ते ताट मला दे. मला काय करावे कळत नव्हते. पण मी ते ताट घेऊन महाराजांच्या समोर ठेवले आणि चक्क महाराजांचा हात फोटोतून बाहेर येऊन ताटातील भात महाराज खाऊ लागले. ते बघून मी खूप आनंदित झाले आणि नकळत माझे हात जोडले जाऊन समोर जे काही दिसत आहे ते जणू स्वप्नातच आहे अशा रीतीने मी बघत उभी राहिले. महाराजांनी ताटातील पूर्ण भात संपवला आणि मला म्हणाले, “जा अजून भात घेऊन ये” मी अगदी आनंदाने हो म्हणून पटकन ते ताट उचलून घेतले आणि पळत पळत स्वयंपाक घरात जाऊन परत ताटामध्ये भात घेऊन आले. पण बाहेर येऊन पाहते तर काय जिथे महाराजांचा फोटो होता, देव्हारा होता तिथे काहीच नव्हते. मी सैरभैर होऊन सगळीकडे शोधले पण मला कुठेच काही दिसले नाही. मग मी नाराज होऊन ताट घेऊन परत स्वयंपाक घरात जाण्यासाठी निघाले आणि त्याच वेळेस परत मागून हाक आली, “मी इकडे आहे ते ताट दे मला” ती हाक ऐकून मी पटकन मागे फिरून पाहिले तर भिंतीला एके ठिकाणी छोटासा एक चौकोन दिसला. म्हणजे अगदी छोटी चौकट होती. त्यातून उजेड दिसत होता. तिथूनच आवाज येतोय हे माझ्या लक्षात आले. मला खाली बसताही येत नव्हते, तरी पण मी पटकन खाली बसले आणि ताट खाली ठेवून त्या चौकटीतून वाकून बघितले तर मला त्या चौकटीच्या पलीकडे थोडेसे अंतर सोडून महाराज बसलेले दिसले. ते हात करत होते “मला ताट दे” मला काय करावे तेच समजेना. एवढ्याशा चौकटीतून हे ताट मी त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवू. तिकडून महाराज हाताने मला खुणावत होते “ताट दे, ताट दे”
मी महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून, विनम्र भावाने ते ताट मी चौकटी जवळ नेले, तर चक्क त्या चौकटीतून ते ताट आत सरकले आणि मी पण एवढ्याशा चौकटीतून वाकून महाराजांच्या समोर ताट ठेवण्यात यशस्वी झाले. महाराजांसमोर ताट येताच ते माझ्याकडे हसून परत जेवणात व्यस्त झाले. मी मात्र आश्चर्यचकित होऊन या सर्व गोष्टींचा अनुभव घेत होते. इतक्या छोट्या चौकटीतून माझे ताट आत गेलेच कसे? आणि याच संभ्रमात मी डोळे विस्फारून महाराजांकडे बघत होते. ते मात्र हसत शांतपणे भात खात होते. हसून माझ्याकडे स्नेहल दृष्टीने पाहत होते. नकळत माझे हात जोडले गेले आणि हसता हसता डोळ्यांतून आनंदाश्रू येऊ लागले.
मी मनातल्या मनात परत महाराजांना म्हणाले, ‘मी सारखी तक्रार करत होते ना की एकदा तरी तुम्ही माझ्या स्वप्नात या. मी नैवेद्य जो ठेवते त्यातील एक कण तरी ग्रहण करा. महाराज आज खरोखर तुमच्या अस्तित्वाची तुम्ही प्रचिती दिली.” असे मनात म्हणत असतानाच अचानक मला जाग आली आणि मी इकडे तिकडे बघू लागले. त्यावेळी लक्षात आले की, मला हे अगदी पहाटे पहाटे पडलेले स्वप्न होते. मला इतका आनंद झाला की मी हे स्वप्न परत परत आठवत राहिले आणि खूप आनंदीही झाले. महाराजांनी माझ्या मनातली इच्छा माझी, तळमळ इतक्या वर्षांनी का होईना पण पूर्ण केली. त्यानंतर माझा तर विश्वास अजूनच दृढ होत गेला. माऊली इथेच आहेत. ते नेहमीच आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करतात याची प्रचिती आली. या आधी पण बरेच छोटे-छोटे अनुभव आले होते. पण माझ्यासाठी ही प्रचिती खूप महत्त्वाची वाटली. म्हणून मी आपणाकरिता लिहून पाठविली आहे.
जय गजानन माऊली
गण गण गणात बोते.