ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
‘ती पाच कारणे तूही कदाचित जाणत असशील. कारण ज्याविषयी शास्त्रांनी उंच हात करून वर्णन केलेले आहे.’ ओवी क्र. २७८
अठराव्या अध्यायात आलेली ही ओवी किती नाट्यमय आहे! तत्त्वज्ञानासारखा रुक्ष विषय सांगताना माऊली असं बहारदार वर्णन करतात! त्यामुळे तो कठीण भाग सोपा होतो, रंगतदार होतो. अठराव्या अध्यायात अर्जुन पुन्हा एकवार प्रश्न विचारतो. श्रीकृष्ण पुन्हा एकदा त्याला समजावतात. इथे समजावण्याचा विषय आहे. आत्मा आणि कर्म एकमेकांपासून वेगळी आहेत. कर्म कोणत्या कारणाने उत्पन्न होतात? ती पाच कारणं आहेत. वेदान्तात ती सांगितली आहेत.
हा भाग सांगताना माऊली त्याचं वर्णन कसं करतात? ‘तर शास्त्रांनी हात उंच करून ज्याचं वर्णन केलं आहे. अशी ही पाच कारणं आहेत.’
या ओवीतून आपल्या डोळ्यांसमोर लगेच चित्र उभं राहतं. एखादा माणूस हात उंचावतो, हे चित्र. का उंचावतो हात? कारण त्याला काहीतरी बोलायचं असतं. आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचं असतं. त्याला वाटत असतं की, मी जे सांगणार आहे ते महत्त्वाचं आहे, लोकांनी ते ऐकायला हवं. म्हणून येते ही क्रिया हात उंच करण्याची. ज्ञानदेव काय करतात? माणूस करत असलेली ही क्रिया शास्त्रांना / वेदान्ताला लावतात. शास्त्र किंवा वेदान्त त्यामुळे जणू सजीव होतात, आपल्याला माणसाप्रमाणे वाटू लागतात. साहजिकच ते जवळचे भासतात. वेदान्त किंवा शास्त्र याविषयी वाटणारा दुरावा दूर होतो.
ही आहे ज्ञानदेवांची शक्ती आणि युक्ती! ज्ञानदेवांना सांगायचं आहे भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान. पण ते कशा पद्धतीने सांगायचं आहे? त्यांनीच म्हटल्याप्रमाणे –
‘माझा मऱ्हाठाचि बोलू कौतुकें। परि अमृतातेंही पैजां जिंके।
ऐशीं अक्षरें रसिकें। मेळवीन॥’ ओवी क्र. १४ अध्याय ६
‘माझे बोल निव्वळ मराठीत आहेत खरे; परंतु ते प्रतिज्ञेने सहज अमृतालाही जिंकतील अशा गोड अक्षररचनेने मी सांगेन.’
भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे, तर ज्ञानेश्वरी अशी प्रतिज्ञापूर्वक मराठीत लिहिलेली आहे. ही प्रतिज्ञा संपूर्ण ज्ञानेश्वरीत पाळलेली दिसते. पहिल्या पानापासून ते अगदी पसायदानापर्यंत. गोड अक्षररचना याचा अर्थ ‘कानाला गोड लागणारी अक्षरं’ एवढा मर्यादित अर्थ नाही. कानाला ज्ञानेश्वरीतील अक्षर अन् अक्षर गोड वाटतंच, याचं कारण आहे त्यातील ‘उ’कारान्त अक्षर, शब्दयोजना. तसेच त्यात आहे डोळे, कान इ. वेगवेगळ्या इंद्रियांना आनंद देण्याची शक्ती. त्यात अजून एक विशेषण आलेलं आहे ‘अमृताला जिंकणारी अक्षरं.’
यातील अर्थ उलगडून पाहूया. अमृत हे पेय संजीवक, अमरत्व देणारं मानलं जातं. अक्षरांच्या ठिकाणी हा संजीवक गुणधर्म कसा येतो? तर त्यातील अर्थामुळे, आशयामुळे. भगवद्गीता हीच मुळी संजीवक. त्यात दिलं आहे माणसाला जगण्यासाठी उत्कृष्ट तत्त्वज्ञान. ज्याने माणसाची उन्नती होते, बाहेर धावणारी दृष्टी आत वळते.
हे तत्त्वज्ञान मराठीत समजावताना ज्ञानदेवांमधील कवीला सुंदर कल्पना सुचतात. त्यांच्यातील नाटककाराला काही नाट्यात्मक गोष्टी, संवाद सुचतात. जसं इथे आलेलं वर्णन – शास्त्रांनी हात उंचावणं. त्यामुळे मूळ शिकवणं अमृतमय होऊन येते, हृदयाच्या गाभार्यापर्यंत पोहोचते. ही आहे ज्ञानदेवांची अमृतवाणी’
manisharaorane196@ gmail.com