जिल्ह्यातील लोकांसाठी पदांचा उपयोग व्हावा हाच माझा दृष्टिकोन
दुसऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मिळणार समाधान शब्दांत अवर्णनीय
सावंतवाडी : केंद्रात मंत्री असलो तरीही माझं लक्ष हे नेहमीच माझ्या जिल्ह्यावर असतं. कारण मी आज जो काही आहे तो येथील जनतेच्या आशीर्वादामुळे व प्रेमामुळेच आहे. त्यामुळे माझ्या पदांचा उपयोग माझ्या जिल्ह्यातील लोकांना व्हावा त्यांचं जीवन समृद्ध व्हावं यासाठीच मी नेहमी प्रयत्नशील असतो. महाराष्ट्रातील कर्तबगार मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेता म्हणून आजही माझं कौतुक होतं. कारण विकास हाच माझा नेहमी ध्यास राहिला आहे. विकास करताना नुसती दृष्टी असून चालत नाही तर डोळसपणा लागतो, असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यानंतर उपस्थित पत्रकारांशी त्यांनी दिलखुलास चर्चा केली. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संचालक महेश सारंग, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा श्वेता कोरगांवकर,महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगांवकर आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, १९९० साली मी या जिल्ह्यात आलो त्यावेळी या जिल्ह्याच दरडोई उत्पन्न केवळ ४० हजार होते. आज ते अडीज लाख आहे. गोवा, सिक्किम, तमिळनाडू दरडोई उत्पन्नात आपल्यापेक्षा पुढे आहे. येत्या काळात आपल्यालाही ते साडेतीन लाखांपर्यंत पोहचवायचे आहे. त्यासाठी या जिल्ह्यातील तरुणांना बेरोजगारांना व्यवसायांच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा आमचा प्रयत्न राहिला आहे. आज अनेक तरुण-तरुणी स्वयंरोजगाराकडे वळले आहेत. नवनवीन प्रयोग करीत आहेत. त्यांना आर्थिक व मानसिक बळ देणे हे आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींचा काम असतं. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असावा लागतो, असेही ते म्हणाले.
विधानसभेत व आता राज्यसभेतही मी नेहमीच सर्व प्रश्नांना अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. नारायण राणे निरुत्तर होणं हे शक्यच नाही. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आधी अभ्यास करावा व नंतरच बोलावे. जग फार मोठं आहे. सर्व ज्ञान आत्मसात करणं कठीण आहे. मात्र, मला जेवढं शक्य होईल तेवढं नेहमीच आत्मसात करतोय. मिळालेल्या ज्ञानाचा व पदाचा उपयोग जिल्हातील लोकांसाठी कसा करता येईल याचा प्रयत्न असतो. केवळ पैशानेच आनंद मिळतो असं नाही. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मिळणार समाधान शब्दांत सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माझ्या खात्याच्या माध्यमातून ओरोस येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहे. त्याच भुमिपूजन झालं असून लवकरच त्याच काम पुर्ण होईल. या ठिकाणी विविध यंत्रसामुग्रींबाबत व प्रक्रिया उद्योगांबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यात नवं उद्योजक तयार होत आहेत. त्यांनाही येथे प्रशिक्षण मिळेल. तसेच दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे देशातील पहिला मेडिसिन इक्विपमेंट तयार करणारा कारखाना येणार आहे. त्याचप्रमाणे इतर पाचशेहून अधिक उद्योग आणण्याचा मानस आहे. ओरोस येथे प्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना याच ठिकाणी रोजगार मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली.