मुंबई: काँग्रेस नेते संजय निरूपम यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे काँग्रेसने पक्षातून त्यांची हकालपट्टी केली आहे. पुढील ६ वर्षांसाठी त्यांच्यावर ही कारवाई करम्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून संजय निरूपम हे पक्षाविरोधात विधाने करत होते. काँग्रेसकडून ही कारवाई करण्याआधी महाराष्ट्र काँग्रेसने एक प्रस्ताव सादर केला होता. त्यात संजय यांना पक्षातून बाहेर काढण्याबाबत नमूद होते. इतकंच नव्हे तर त्यांना स्टार कँपेनर्सच्या यादीतूनही बाहेरचा रस्ता दाखवला होता.
महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते की संजय निरूपम यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवले आहे. बुधवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत संजयला पक्षातून बाहेर काढण्याचा प्रस्ताव संमत झाला होता.
संजय निरूपम यांना काँग्रेसचा उमेदवार म्हणून मुंबई उत्तर पश्चिम येथून निवडणूक लढवायची होती. मात्र शिवसेनेच्या उबाठा गटाने येथून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिली. यामुळे संजय निरूपम भ़कले. निरूपम यांनी याआधीही जागावाटपावरून शिवसेनेच्या उबाठा गटावर टीका केली होती.
काँग्रेसकडून हकालपट्टी केल्यानंतर संजय निरूपम म्हणाले की काँग्रेसने माझ्यासाठी एनर्जी आणि स्टेशनरी संपवू नये, याउलट त्यांनी उरलेल्या जागा आणि स्टेशनरीचा वापर पक्ष वाचवण्यासाठी करावा. तसेही पक्ष सध्या आर्थिक संकटातून जात आहे.