टोल प्लाझावर रात्री हल्ला, दोघांचा मृत्यू
भोपाळ : मध्य प्रदेशातील टोल प्लाझावर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केल्याने दोन कर्मचारी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धूम ठोकून मागच्या दाराने पळत सुटले. पण दुर्दैवाने रात्रीच्या अंधारात त्यांना पुढे असलेल्या विहिरीचा अंदाज आला नाही आणि ते त्या विहिरीत पडून बुडाले. आग्रा येथील श्रीनिवास परिहार आणि नागपूरचे शिवाजी कांदेले यांचे मृतदेह काल विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
ही घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्गावरील दगराई टोल प्लाझा येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या हल्ल्याचे फुटेज मिळाले आहेत. या फुटेजमध्ये मुखवटा घातलेले काही पुरुष टोल बूथजवळ चार दुचाकींवर फिरत होते. त्यानंतर ते टोल काउंटरच्या दारावर लाथा मारण्यास सुरुवात करतात आणि काहीजण बूथमध्ये प्रवेश करतात. हल्लेखोर संगणकाचे नुकसान करताना, टोल प्लाझा कर्मचाऱ्यांना मारहाण करताना आणि त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
हल्लेखोरांनी हवेत गोळीबार सुरू केल्यावर जीव वाचवण्यासाठी कर्मचारी शेजारच्या शेतात धावले. ते धावत असताना परिहार आणि कांदेले कार्यालयाच्या मागे असलेल्या उघड्या विहिरीत पडले आणि बुडाले.
झाशी आणि ग्वाल्हेर दरम्यानच्या टोल प्लाझाचा करार १ एप्रिल रोजी बदलला आणि तो नवीन कंत्राटदाराकडे गेला. काही स्थानिकांची, पूर्वीच्या कंत्राटदाराशी समजूत होती आणि ते त्यांच्या वाहनांचे टोलचे पैसे न देता जात असत. मात्र नवीन कंत्राटदाराने त्यांना नकार दिला. यामुळे वादाची ठिणगी पडली आणि मंगळवारी रात्रीच्या हल्ल्याची योजना नवीन कंत्राटदाराला घाबरवण्यासाठी आखण्यात आली होती.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.