पालघर : यंदा कमी पाऊस झाल्याने धरणात पाणी साठले नाही. अगोदरच कमी पाणी असल्याने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट होते. पालघर जिल्ह्यात असलेल्या धरणांमध्ये चाळीस टक्केच पाणीसाठा असल्याने काही दिवसांत जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट येणार आहे.
पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या धामणी, कवडास, ढेकाळे, कुरंझे, अस्वाली या धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे. अजूनही पावसाला अडीच ते तीन महिने असल्याने पालघरसह वसई-विरार महापालिका व मीरा- भाईंदर महापालिकेला येत्या काही दिवसांत पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. आगामी दोन-अडीच महिन्यांत दोन्ही महापालिकेतील पाणीपुरवठ्यात कपात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणात सध्या ४० टक्के पाणीसाठा असून या धरणामधून जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी सोडले जाते. त्यामुळे अजूनही काही दिवस कालव्यामार्फत शेतीसाठी पाणी सोडले जाणार असल्याने मेपर्यंत जिल्ह्यासह वसईवर आणि मीरा-भाईंदर महापालिकेला पाणीटंचाई भासणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.