चारफाट्यावरील उठविलेल्या बांधकामास आचारसंहितेमध्ये पुन्हा ऊत; अधिकारी वर्गाची टाळाटाळ
कर्जत : दोन वर्षांपूर्वी नारीशक्ती संघटनेने टिळक चौकामध्ये तीन दिवस उपोषण करून चार फाट्यावरील शासकीय जागेवर अनधिकृत अतिक्रमण केलेले बांधकाम हटविण्यात आले होते. मात्र पुन्हा त्याच ठिकाणी अनधिकृत बांधकामे होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई करण्यास टाळटाळ करीत आहे. एकीकडे कर्जत शहरात विकास होत आहे, तर दुसरीकडे अनधिकृत बांधकामांना ऊत आला आहे. यामुळे पुन्हा समस्या उद्भवणार आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा केली असता, उपभियंता संजय वानखेडे यांचे असे म्हणणे आहे की चारफाटा ते बिकानेर रस्ता हा नगरपरिषद हद्दीमध्ये येतो. त्यांनी बांधकाम तोडावे तसेच ज्या रस्त्याचे काम ठेकेदार संभाजी जगताप यांनी केले आहे. त्यांना आम्ही सांगितले आहे, तर नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सदरील रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत आहे. आम्ही फक्त रस्त्याचे काम फक्त केले. मात्र आजूबाजूची जागा ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी त्यांनी ज्याप्रमाणे कारवाई केली. त्याप्रमाणे नवीन होणारे अतिक्रमण ते त्यांनी पुन्हा हटवावे. जर का आमच्या हद्दीमध्ये बांधकाम येत असेल, तर ते अतिक्रमण आम्ही हटवू. मात्र तसे सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्र आम्हास द्यावे. आम्ही त्वरित त्या बांधकामावर कारवाई करू.
दोन वर्षांपूर्वी देखील अशी समस्या उद्भवली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदारी झटकत होते, तर नगर परिषदही जबाबदारी झटकत होते. त्यामुळे त्या चारफाटाचा तिढा सुटत नव्हता. अखेर नारीशक्ती संघटनेच्या महिलांनी तीन दिवस उपोषण करून अधिकारी वर्गास चार फाट्यावरील शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण तोडण्यास भाग पाडले.
बांधकाम तोडल्यानंतर पुन्हा सहा-सात महिन्यांनी त्या ठिकाणी बांधकाम होण्यास सुरुवात झाली. तेव्हादेखील वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून ते बांधकाम पोलीस बंदोबस्त घेऊन पुन्हा तोडले. मात्र आचारसंहिता लागू झाल्यास पुन्हा त्याच ठिकाणी हळूहळू अतिक्रमण होण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले असता, वारंवार ही आमची हद्द येत नसून नगर परिषदेची हद्द आहे. मात्र नगर परिषद याबाबत पत्र मागत असून तसे पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग देत नाही. नक्की यामागचे गौडबंगाल काय? कदाचित सार्वजनिक बांधकाम विभागाला कारवाई करायची नसेल म्हणून त्यांची हद्द असूनदेखील दुसऱ्यांचे हद्द असल्याचे सांगत आहे.
चारफाटा ते बिकानेर रस्ता जर नगरपरिषदेने केला आहे. तर तेथील अनधिकृत बांधकामे नगर परिषदेने हटवावे ती आमची हद्द येत नाही, असे उपाभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, संजय वानखेडे यांनी सांगितले.
जर सार्वजनिक बांधकाम विभागाची जमीन आमच्या हद्दीमध्ये येत असेल तसे नगर परिषदेला पत्र द्यावे आम्ही त्वरित होणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करू, असे कर्जत नगरपरिषद येथील मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी सांगितले.