रत्नागिरी : तालुक्यातील जांभरुण गावातील कातळशिल्पांना ऐतिहासिक महत्त्व आहे. यामध्ये एकाच ठिकाणी नऊ मनुष्याकृती असून त्यातील एक आकृती, तर आठ फुटाची, तर इतर आकृत्या पाच फूट उंचीच्या आहेत. एकाच ठिकाणी पंचवीस ते तीस खोदशिल्प बहुतेक याच ठिकाणी असावीत. त्यामधील काही आकृत्या तर अनाकलनीय आहेत, अशी माहिती निरीक्षण क्षेत्रभेटीवेळी मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांना दिली.
जिल्हा परिषद शाळा जांभरुण नंबर एकच्या विद्यार्थ्यांनी जांभरुण गावात असलेल्या कातळशिल्पांना नुकतीच भेट दिली. कातळशिल्प ही ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. या कातळशिल्पांना खोद चित्र असेही म्हटले जाते. याबाबत विद्यार्थ्यांनाच नव्हे प्रत्येकाला उत्सुकता असते. या क्षेत्र भेटीमधून कातळखोद चित्रांची माहिती मिळाली. ही कातळशिल्प दाखवण्यासाठी जांभरुण गावचे सरपंच गौतम सावंत यांची मदत मोलाची होती. मुख्याध्यापक राजेश पवार यांनी मार्गदर्शन केले, तर राजू कोकणी, कोतवाल यांच्या सहकार्यामुळे ही क्षेत्र भेट यशस्वी झाली. त्यांनी ही कातळशिल्प संरक्षित केली जातील, असे आश्वासन दिले. अशी कातळशिल्पे गोवा, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सुद्धा आहेत.
मानवाने कोरलेल्या काही भौमितिक आकृत्या, तर नवीन वैज्ञानिक युगालासुद्धा मागे काढतील अशा आहेत, प्रमाणबद्ध आहेत. येथे कोरलेले काही प्राणी, पक्षी कोकणात आढळत नाहीत.
त्यांच्या डोक्यावर वेगळे गोलाकार आकार आहेत. वेतोशी, नरबे व जांभरुण या तीन गावच्या सीमेवर कातळशिल्प म्हणजेच खोद चित्र आहेत. निवळी, करबुडे, देऊड आणि जांभरुण या गावात सपाट कातळावर विविध आकृत्या जांबा दगडात कोरलेले आहेत. या ठिकाणी पक्षी, प्राणी यांची चित्रे न समजणारे आहेत. या ठिकाणी नऊ मनुष्याकृती आहेत. त्यातील एक आकृती, तर आठ फूट आहे व इतर आकृत्या या पाच फुटांच्या दरम्यान आहेत. एकाच ठिकाणी एवढ्या मनुष्याकृती आहेत हे विशेष आहे. या मनुष्यकृती पुरुषांच्या आहेत, अशा खुणा दिसतात. एकाच ठिकाणी पंचवीस ते तीस खोदशिल्प बहुतेक याच ठिकाणी असावीत. काही आकृत्या, तर अनाकलनीय आहेत. कोकणातील या कातळशिल्पांचे जतन संवर्धन व संशोधन होणे गरजेचे आहे. अनेक इतिहास संशोधक या कातळशिल्पावर अभ्यास करत आहेत.
कोकणात अनेक पर्यटन स्थळ आहेत. त्याच्या जोडीला कातळशिल्पांचा प्रचार केला, तर ती पाहण्यासाठी पर्यटक येऊ शकतात. या माध्यमातून खोदचित्रांचे संवर्धन होईल आणि पर्यटनातून गावपातळीवर रोजगार निर्मितीला चालना मिळेल. गावागावांत असणारी अशी कातळशिल्पे गावातील लोकांनी एकत्रित येऊन जपली पाहिजेत, असे संतोष रावणंग यांनी सांगितले.