Friday, May 23, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

खैरणे एमआयडीसीतील तीन कंपन्या जळून खाक

खैरणे एमआयडीसीतील तीन कंपन्या जळून खाक

अग्निशमन दलाच्या जवानांनी ८ तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आणली आग


नवी मुंबई(प्रतिनिधी) : एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये आग लागण्याचे सत्र सुरूच असून मंगळवारी सकाळी खैरणे औद्योगिक वसाहतीतील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये नवभारत इंडस्ट्रियल कंपनीसह तीन कंपन्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसली तरी तीन्ही कंपन्यांमधील लाखो रुपये किंमतीचा माल जळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी २० ते २५ बंबाच्या सहाय्याने सायंकाळी ६ च्या सुमारास येथील आग आटोक्यात आणली. सदर आगीमागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास खैरणे औद्योगिक वसाहतीतील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीमध्ये भिषण आग लागली. सुदैवाने कंपनीतील कामगारांनी वेळीच बाहेर पळ काढला. या आगीची भीषणता इतकी प्रचंड होती की आगीमुळे संपुर्ण परिसरात मोठयाप्रमाणात धुराची काळी चादर पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र कंपनीत असलेल्या रसायनामुळे सदर आग नवभारत नवभारत इंडस्ट्रियल कंपनीच्या लगत असलेल्या गोयंका फुड्स आणि जास्मीन ऑटो प्रिंटर्स या दोन कंपन्यांमध्ये पसरली. त्यानंतर आगीचे रौद्र रुप पाहून त्याठिकाणी नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.


त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी २० ते २५ बंबाच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न करत सायंकाळी 6वाजपर्यंत येथील आग आटोक्यात आणली. त्यानंतर या ठिकाणी सायंकाळी उशीरापर्यंत कुलींगचे काम सुरु होते. सुदैवाने या आगीत कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसली तरी या आगीत तीन्ही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे या आगीत तीन्ही कंपन्यांचे मोठÎा प्रमाणात नुकसान झाले आहे. तिन्ही कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी आगीचा धोका लक्षात घेऊन वेळीच कंपनीतून बाहेर पळ काढल्याने जीवितहानी टळली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळी तुर्भे पोलिसांसह वाहतूक पोलीस दाखल झाले होते.

Comments
Add Comment